1 मे पासून आदर्श शाळेत मर्दानी खेळांचे शिबिर
तेजस्वीनी गव्हाणे देणार लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजीचे प्रशिक्षण
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिव आनंद व रॉयल फाउंडेशन, वणीच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, १ मेपासून २६ जून असे हे शिबिर चालणार आहे. प्रशिक्षक म्हणून तेजस्विनी गव्हाणे आहेत.
प्रत्येक महिला व पुरुषात बचावाचे असे काही मर्दानी: गुण असणे काळाची गरज असून, आजच्या आधुनिक युगात असे मर्दानी खेळ लुप्त होत चालले आहेत. शिव आनंद व रॉयल फाउंडेशन, वणीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे, तसेच यातून महिला सक्षम झाली पाहिजे, पुढची महिला ही सुदृढ व सक्षम असली पाहिजे, तिला संघर्षाशी लढता आले पाहिजे, असे विविध उद्देश आहेत.
विशेष म्हणजे मर्दानी खेळाचे हे प्रशिक्षण अवघ्या दहाव्या वर्गात शिकत असलेली तेजस्विनी राजू गव्हाणे ही देत आहे. रोज या प्रशिक्षण वर्गात सुमारे ८० ते ९० विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरविणार आहेत. सायंकाळी ४:०० ते ६:०० या कालावधीत आदर्श हायस्कूल, वणी येथे हे प्रशिक्षण होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने राजू गव्हाणे, विजय गव्हाणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अधिक माहितीकरिता राजु गव्हाणे 9764253253, विजु गव्हाणे 9822926480 यांच्याशी संपर्क करावा. शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments are closed.