बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे लग्नकार्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून एका व्यक्तीवर बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी बाबाराम रामेश्वर सोयाम (60), शेतमजुरी करणारे व मार्डी येथील रहिवासी, हे 7 मे रोजी सकाळी सुमारे 8 वाजता पुतणीच्या लग्नकार्यामुळे पाहुण्यांना बोलावण्यासाठी भावाच्या घरी जात होते. त्यावेळी आरोपी संतोष नथ्थुजी सोयाम (47), राहणार मार्डी, याने त्यांना अडवून मुलाच्या लग्नावेळी झालेल्या शिवीगाळीवरून वाद घातला. वाद वाढताच आरोपीने घरातून येळवाची काठी आणून बाबाराम सोयाम यांच्या कपाळावर व डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत रक्तस्राव झाला. आरडाओरडा ऐकून उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेत भांडण थांबवले.
या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पो. शी. सागर दीपेवार करत आहेत.




Comments are closed.