मृत्यूलाही यावी करुणा इथे…

मारेगावच्या कब्रस्थानचा विकास शून्य

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मृत्यूलाही करुणा यावी, अशी अवस्था येथील मुस्लीम कब्रस्थानाची झालीय. तालुक्यात मुस्लिम समुदाय खूप मोठा आहे. शहराच्या कोलगाव रोडवर 4 एकर जमिनीवर कब्रस्थान आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी माजी आमदार वामनराव कसावर यांनी 55 लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून दिला होता. या निधीमधून दफनभूमीपर्यंत सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती. आज मात्र या कब्रस्थानाचा विकास शून्यच आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

आज या बांधकामास दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मारेगाव नगरपंचायतीस 5 वर्षे पूर्ण होत आहेत. शहराच्या विकासाकरिता शासनाच्या वतीने 5 वर्षात सुमारे 13 कोटी 50 लाखांचा निधी मिळाला. हा निधी शहरातील रस्ते, नाली स्मशानभूमीसाठीच खर्चीला गेला आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत मारेगावच्या कब्रस्थानासाठी एक पैशाचासुद्धा निधी मिळाला नाही. त्यामुळे मारेगावच्या मुस्लिम कब्रिस्थानाची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे लोकप्रतीनिधींच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

याबाबत मारेगाव मुस्लिम समितीच्या शिष्टमंडळाने दफनभूमीच्या निधीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदाराकडे संपर्क साधला असताना मात्र, आश्वासनाशिवाय काहीच उपयोग झाला नाही. तसेच वणी विधानसभेचे आमदार संजी रेड्डी बोदकुरवार यांनासुध्दा तीन वेळा भेटी दिल्यात. आजपर्यंत त्यांनीसुध्दा एक रुपयाचाही निधी कब्रस्थानाच्या विकासासाठी मंजूर केला नाही. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील मुस्लीम बांधवांची घोर निराशा झाली आहे.

मारेगाव येथील कब्रस्थानामध्ये रस्त्याची सुविधा नाही. हायमास्ट लाईट देण्यात आलेला नाही. अस्वच्छता आहे. त्यामुळे दफनविधीच्या वेळी या समाजबांधवांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. कबरस्थानात पिण्याच्या पाण्याची टाकी, सिमेंट रस्ता, हायमास्ट लाईट,स्वच्छता या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याची पूर्तता व्हावी अशी मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.