लाखोंचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करणारा मास्टरमाइंड जेरबंद
विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मदतीने केली होती घरफोडी
बहुगुणी डेस्क, वणी: ७ एप्रिलला मारेगाव येथे एका घरात धाडसाने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली. मुख्य सूत्रधार दत्ता सटवाजी कुरकुटे (राहणार नागेशवाडी, ता. पुसद) याला अटक करण्यात आली असून, चोरीचा शत-प्रतिशत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मारेगाव येथील सुशील जगेंवार यांच्या घरात 7 एप्रिलला घरफोडी झाली होती. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे विविध दागिने आणि रोकड असा एकूण 21 लाख 37 हजार 771 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन विचारणा केली.
या बालकांनी चोरीची कबुली देत सांगितले की, त्यांनी नथ्थू कुरकुटे आणि दत्ता कुरकुटे यांच्या मार्फत चोरीचे दागिने विक्री केले आहेत. पोलिसांनी तात्काळ पुसद येथे सापळा रचला आणि मुख्य आरोपी दत्ता सटवाजी कुरकुटे याला ताब्यात घेतले. त्याच्या निर्देशानुसार उमरखेड येथील एका सराफाकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
कारवाईदरम्यान विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 21,37,771 रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, यवतमाळ पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बिजे, पीआय सतिश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दत्ता पेंडकर, एपीआय धीरज बांडे, पीएसआय धनराज हाके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण टीमने (शरद लोहकर, मुन्ना आडे, सतोष भोरगे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, तेजाब रनखांब, सुभाष जाधव, कुनाल मुडेकार, रमेश राठोड, सलमान शेख, रजनिकांत मडावी, सुनिल पंडागळे, राजेश जाधव, रविंद्र श्रिरामे, सतिश फुके) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



Comments are closed.