नागेश रायपुरे, मारेगाव: ओव्हरलोड वाहतुकीमुळे मारेगाव-मार्डी रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्याने येणा-या जाणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या गंभीर प्रश्नी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.
मारेगाव ते मार्डी हा 11 की.मी.चा रस्ता आहे. या रस्त्याची जडवाहतुकीची क्षमता नाही. मात्र या रस्त्यावर राजरोसपणे ओव्हललोड वाहतूक होते. परिणामी इथला रस्ता उखडला आहे. तसेच रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहतूक करणा-यांना त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे मोठे अपघात झाले नसले तरी छोटे अपघात नित्याचीच बाब आहे.
दरम्यान खैरी ते नांदेपेरा-वणी हा रस्त्याचे काम नव्याने सुरू होणार असून रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारा आवश्यक साहित्य पुरवठ्याची वाहतूक याच रस्त्याने केली जाते. महिनाभरापूर्वी हा रस्ता ग्रामीण भागातील वाहतुकदारांसाठी सुलभ असताना आता मात्र क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याचा चेहराच बदलला आहे.
या रस्त्याकडे ना प्रशासनाचे लक्ष गेले आहे ना लोकप्रतिनिधींचे. या रस्त्यावरील ज़ड वाहतूक बंद करून उखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी अपेक्षा या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)