तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी नगर विकास मंत्रालयाकडून मारेगाव नगर पंचायतला तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. शहर विकासाचे कामे करण्यासाठी बांधकाम विभाग मारेगाव यांना कामे करण्याचे आदेश शासनाने दिले. निधीच्या कामाचं टेंडरिग झालं. मात्र राजकारण आणि कमिशन यातून या कामाचा खोळंबा होत असल्याचं बोललं जात आहे. याआधी हा निधी खर्च न केल्याने परत गेला होता. आता या निधीच्या खर्चाची मुदतवाढ करूऩ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही विकासकामांना दिरंगाई होत असल्याचेच दिसून येत आहे.
निधी न वापरल्याने शहर विकासाचे कोणतेच कामे झाली नाही, त्यामुळे जनतेचा रोष नगर पंचायतीवर आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागाचा निष्क्रियपणाही चव्हाट्यावर आला आहे. नगरपंचायतला मिळणारा कर यातून शहराची नाले सफाई, रस्ते दुरस्ती, पथदिवे इत्यादी कामे केले जाते. मात्र ही कामं वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी असून, नुकताच झालेल्या संततधार पावसाने नालेसफाई अभावी शहरवासियाच्या घरात पाणी शिरलं होतं. त्यावरून नगरपंचायत प्रशासनाची कार्यप्रणालीत चव्हाट्या आली होती.
शहराचा विकास करण्यासाठी सरकार द्वारे रस्ते विकास निधि अंतर्गत नगरपंचायतला तीन करोड़ रुपयांचा निधि मंजूर करण्यात आला. मात्र तू तू मै मै मध्ये या निधीचा कालावधी निघुन गेला. शहरात अनेक समस्या आवासुन उभ्या आहे. सध्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी अद्याप पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले नसून ते कासव गतीने सुरु आहे. प्रभाग 3, 4 मध्ये अत्यंत बिकट परस्थिती आहे. या दोन प्रभागात नाल्या अंतर्गत रस्ते अजुन पर्यन्त झाले नसल्याने नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे.
अनेक भागात चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे डासाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध समस्येने त्रस्त मारेगावकर सध्या नगरपंचायतीपेक्षा आमची ग्रामपंचयातच बरी असे बोलू लागले असून विकासाच्या बाबतीत नागरिकात संतापाची लाट उसळली आहे.