अखेर बेपत्ता शेतक-याचा आढळला मृतदेह

कानडा येथील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: मागील सात ते आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या या युवकाचा अखेर मृतदेहच हाती लागला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कानडा येथील शेतकऱ्याने विष घेऊन आपले जीवन संपविले. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दीपक देवराव बोथले वय 32 असे आहे.

दीपक हा आपल्या वडिलांसोबत शेती तसेच रोजमजुरी करून जीवन जगत होता. वडिलांच्या नावाने असलेल्या 5 एकर शेती यामध्ये ते आपला उदरनिर्वाह करायचे. अशातच मागील काही वर्षांपासून सुरु असलेली नापिकी आणि उत्पन्नात होत असलेली घट यामुळे ते कर्जाच्या खाईत होते.

अशातच मागील वर्षी काही व्यक्तींकडून त्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते. आता ते कसे फेडायचे याच विचारात तो मागील काही दिवसांपासून होता. याच विवंचनेत असतांना तो मागील सात ते आठ दिवसांपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार दि. 1 डिसेंबरला मारेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. मात्र आज दि. 5 डिसेंबरला सकाळी 8 ते 9 च्या सुमारास तो वरोरा आणि मार्डा दरम्यान असलेल्या एका शेतामध्ये पडून असल्याची माहिती मिळाली.

त्याच्या मृत्यूने समाजमन सुन्न झाले असून दीपकला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आणि आईवडील असा आप्तपरिवार आहे. त्याचेवर वरोरा येथे पंचनामा सुरु होता.

Comments are closed.