आणखी अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी बेपत्ता

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले, पालक चिंताग्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील एका गावात राहून वणी येथील एका नामांकित महाविद्यालयात 11वी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी 3 डिसेंबर रोजी कॉलेजला गेली. मात्र संध्याकाळी घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. अखेर तिच्या वडिलांनी कुणीतरी अज्ञात व्यक्तिने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला दाखल केली. सुदैव म्हणजे बेपत्ता विद्यार्थिनी दुसऱ्या दिवशी घरी परतल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हलाकीची परिस्थिती व कुटुंबात दररोज होणाऱ्या भांडणामुळे कंटाळून मामाकडे गेल्याची माहिती परत आलेल्या मुलीनी दिली आहे.

मागील काही काळापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी तरुणासोबत मैत्री होऊन अल्पवयीन मुली घरून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहे. सोशल मिडियामुळे मुलं मुलींमध्ये संपर्क जास्त वाढत आहे. व्हॉटसएप, फेसबुक, इन्स्टाग्राम याचा मुलं मुली सर्रास वापर करीत आहे. याचा फायदा घेऊन काही तरुण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे.

अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सोपे असते. कारण त्यांना भविष्याबाबत योग्य ती जाणं नसते. प्रियकर आपल्यावर जीव ओवाळून टाकतोय म्हणजे तो ‘हीरो’ आहे. असा मुलींचा समज असतो. वयात येत असताना लग्नाबाबत आकर्षणही असते. त्यामुळे आई वडिलांची समाजात इज्जत, बहीण भावांनी दिलेले प्रेम सर्व काही विसरून ती अनोळखी तरुणासोबत पळून जाताना काही विचार करीत नाही.

स्मार्टफोनचा गरजेपेक्षा अधिक वापर, पालकांचे दुर्लक्ष आणि संस्काराअभावी 14 ते 17 वयोगटातील मुले-मुली प्रेम प्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे. याबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांमुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवायला पाहिजे.

आपल्या पाल्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत. त्यांच्या शाळेतील वावर, याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या पाल्यांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून संवाद साधण्याची गरज आहे. याशिवाय तरुण वयातील मुला मुलींचे समुपदेशन देखील करणे गरजेचे आहे.

Comments are closed.