वाटल्यास मला एक हाण, पण तुमचा वाद मिटवा !

शुल्लक कारणावरून बापलेकाची दोन भावांना रॉड व काठीने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: वाटल्यास मला एक हाण, पण तुमचा वाद मिटवा, अशी एका भावाने विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चिडलेल्या बापलेकाने दोन भावंडांना रॉड व काठीने बेदम मारहाण केली. यात दोघं भावडं जखमी झालेत. राजूर कॉलरी येथे शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बापलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी मोहम्मद आसिफ एनुल हक (25) हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून तो एका कोल वॉशरी लोडर ऑपरेटर म्हणून काम करतो. शुक्रवारी 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास आसिफ गावातील एका दुकानासमोर बसून होता. त्याच वेळी तिथे आरोपी मो. कादीर अली झाकीर अली (48) व त्याचा मुलगा मो. सलीम उर्फ सैफ कादीर अली हातात रॉड घेऊन आले. त्यांनी आसिफला त्याचा लहान भाऊ मौला कुठे आहे असे विचारले.

त्यावर आसिफने माहित नाही, असे उत्तर दिले. त्यावर चिडलेल्या बापलेकाने आसिफवर शिविगाळ करीत रॉडने हल्ला केला. भावाला मारहाण होताना पाहून आसिफचा भाऊ मो. आमिन हा तिथे आला. आमिनने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. वाटल्यास मला एक हाण पण वाद मिटव अशी विनंती देखील त्याने केली. मात्र बापलेकाने आसिफचा भाऊ आमिनलाही काठीने मारहाण केली.

या मारहाणीत मो. आसिफ व त्याचा भाऊ मो. आमिन हे दोघे जखमी झालेत. त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी मो. कादीर अली झाकीर अली व त्याचा मुलगा मो. सलीम उर्फ सैफ कादीर अली याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 118 (1), 351 (2), 351 (3), 352, 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.