देवस्थान समितीेने घातली प्रेमीयुगलास लग्नाची बेडी
पदाधिकारा-यांनी केले कन्यादान तर शिरपूरकर झाले व-हाडी
बहुगुणी डेस्क: दोघांनी प्रेमाच्या आणभाका घेतल्या होत्या. मात्र घरून लग्नाला विरोध होता. काय करावं हा विचार त्यांना सतावत होता. अखेर शिरपूर येथील देवस्थानात शीव-पार्वतीच्या साक्षीने या जोडप्याचं लग्न लावून देण्यात आलं. या लग्नात मुला मुलींचे कोणतेही नातेवाईक उपस्थित नव्हते. त्यामुळे सर्व कार्य कैलास देवस्थानचे सदस्य आणि पदाधिका-यांनी पार पाडले.
निलेश सुभाष चिव्हणे (22) हा गोडगाव कायर येथे राहतो. तो शेती करतो. तर श्रद्धा बाळकृष्ण लोणारे (19) ही परसोनी येथील रहिवाशी आहे. श्रद्धा ही निलेशच्या नात्यात येते. नातेसंबंधात येत असल्याने त्यांची आधीपासूनच ओळख होती. अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे सुरू असायचे.
पुढे श्रद्धा ही वणीला महाविद्यालयीन शिक्षणासाठी आली. निलेशदेखील कामानिमित्त बरेचदा वणीत यायचा. दरम्यान
त्यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्या. पुढे दोघांच्या नात्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुटला. त्यांचं नात आणखी घट्ट होऊ लागलं.
अखेर श्रद्धा आणि निलेशच्या प्रेमाची गोष्ट दोघांच्याही घरच्यांना माहिती झाली. श्रद्धाच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. मात्र दरम्यान दोघांनी ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’च्या आणाभाका घेतल्या. दोघांनाही एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटू लागले. अखेर या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी सकाळी मुलगी परसोनीहून निघाली. तर मुलगा कायरहून. दोघांनी वणीला भेट झाली. काही मित्रपरिवाराला सोबत घेऊन त्यांनी थेट शिरपूर गाठले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी शिरपूर येथील कैलास शिखर देवस्थानाचे धीरज डाहुले यांची भेट घेतली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. धीरज डाहुले यांनी देवस्थानातील इतर पदाधिकारी व सदस्यांना ही बाब कळवली.
अखेर मंदिरात शीव-पार्वतींना साक्षी ठेवून या दोघांचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी देवस्थानाचे पदाधिकारी या मुलामुलींचे पालक झाले. तर गावकरी व-हाडी. त्यांनीच मुलींचे कन्यादान करून दिले व नवदाम्पत्यांना भावी जीवनासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. यानंतर दोघांनी शिरपूर पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व वृत्तांत सांगितला. यावेळी शिरपूरचे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार दिपक पवार यांनी आणि कर्मचा-यांनी त्यांना धीर देत या दोघांनाही आशीर्वाद दिला.
नवदाम्पत्यांनी केले वृक्षारोपण
लग्न झाल्यानंतर देवस्थानाच्या परिसरात या नवदाम्पत्यांनी वृक्षारोपण केले. अखेर सर्वांचे तोंड गोड करून या सर्व कार्यक्रमाचा समारोप झाला. या शुभविवाहास डॉ. धीरज डाहुले, मोरेश्वर पोतराजे, शंकर वाभिटकर, कवडू गावंडे, लिकेश चेंडे, ईश्वर कातारकर, आणि शिरपूर येथील गावकरी उपस्थित होते.