लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या

घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने कुरबुरी, उदय विलास लॉजमध्ये घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बस स्थानक समोरील उदय विलास लॉजमधील खोलीत एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अंकित अनिल चिकाटे (26) रा. भीमनगर वणी असे मृतकाचे नाव आहे. त्याने एका महिलेसोबत घरच्यांच्या इच्छेविरोधात लग्न केले होते. काही दिवसांपासून तो त्याच्या आईपासून पत्नीसह वेगळा राहत होता. 

सविस्तर वृत्त असे की अंकित अनिल चिकाटे (26) हा भीमनगर येथील रहिवाशी होता. तो मजुरी तसेच कलर पेन्टींग्जचे काम करायचा. काही वर्षांआधी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तो त्याच्या आई व बहिणीसोबत राहायचा. काही महिन्यांआधी त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याने त्या महिलेशी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र या लग्नाला त्याच्या आईची मंजुरी नव्हती.

अखेर अंकितने आईच्या मर्जीविरोधात जात तीन महिन्याआधी महिलेशी लग्न केले. त्यानंतर अंकित त्याची आई व पत्नीसह भीमनगर येथील घरी राहत होता. मात्र अंकितच्या आईचे व अंकितच्या पत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने कुरबुरी होत असल्याची माहिती आहे. त्यातून एक महिन्याआधी त्यांच्यात भांडण झाले व त्याच्या आईने मुलगा आणि सुनेला घर सोडण्यास सांगितले.

तेव्हापासून अंकित हा पत्नीसह रूम करून राहत होता. त्यानंतर तो गेल्या दोन आठवड्यांपासून बसस्थानक जवळील उदय विलास लॉजमध्ये पत्नीसह राहत होता. शुक्रवारी मध्यरात्री (10 सप्टेंबर) दोन वाजताच्या सुमारास लॉजमधील कर्मचा-याला खिडकीतून अंकितने गळफास घेतल्याचे आढळले. त्यामुळे लॉज मालकाने याची त्वरित पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून याची माहिती अंकितच्या नातेवाईकांना दिली.

पोलिसांनी दरवाजा उघडून बघितला असता अंकित पॅन्टला लावायच्या बेल्टने छताच्या लोखंडी कडीला गळफास घेतला असल्याचे अवस्थेत आढळला. पोलिसांनी अंकितला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अंकितने शुक्रवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. अंकितच्या आत्महत्येबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.