मतदार राजा… या रविवारी जोडा मतदान ओळखपत्राला आधार कार्ड

संपूर्ण तालुक्यात शिबिराचे आयोजन.. मतदान केंद्र किंवा तहसील कार्यालयात भेट देण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय येथे मतदान ओळखपत्राला आधारकार्ड जोण्याबाबत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण वणी तालुक्यातही हे शिबिर राबवले जाणार आहे. तालुक्यातील संपूर्ण मतदारांनी मतदान केंद्रात भेट देऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. 

मतदार याद्यांचे प्रमाणीकरण करणे, दुबार नावे वगळणे इत्यादींसाठी निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारकार्डशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून या मोहीमेला सुरूवात झाली आहे. आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका इत्यादी निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांना याचा फायदा होणार आहे.

कुठे भेट द्यावी?
मतदाराने या पूर्वी ज्या निवडणुकीसाठी मतदान केले, त्या मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी त्याला आधार कार्ड, मतदार कार्ड तसेच स्वत:चा किंवा परिचितांचा एका मोबाईल जवळ ठेवणे गरजेचे आहे. मतदान केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने मतदाराचे मतदार कार्ड हे आधार कार्डाशी संलग्न करून दिले जाणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही.

दुसरी पद्धत आहे का?
मतदारांना स्वत: देखील ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डाशी मतदान कार्ड संलग्न करता येऊ शकते. त्यासाठी www.nvsp.in या साईटवर जावे लागेल. तिथे तीन नंबर चा ऑपशन (Information of Aadhaar Number by Existing Electors) वर क्लिक करून पुढल्या प्रक्रिया पार करून लिंक करता येते. मात्र सर्वसामान्य मतदारांसाठी ही प्रक्रिया किचकट ठरू शकते. त्यामुळे 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण तालुक्यात आधार कार्डाशी मतदान कार्ड संलग्न करण्याचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ज्या केंद्रात मतदान करता. त्या केंद्रात जाऊन या सेवेचा लाभ मतदारांना घेता येऊ शकते. किंवा तहसिल कार्यालय येथे देखील मतदारांना संपर्क साधता येऊ शकतो. या शिबिराचा तालुक्यातील सर्व मतदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.

Comments are closed.