वणीत औषधी विक्रेत्यांचा कडकडीत बंद

मोर्चा काढून ऑनलाईन औषध विक्रीचा विरोध

0

विवेक तोटेवार, वणी: ऑनलाइन औषधी खरेदीविरोधात औषध विक्रेत्यांनी वणीमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळला. वणीत रॅली काढून व जोरदार घोषणाबाजी देऊन औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसीचा जोरदार विरोध केला. दरम्यान वणीतील सर्व मेडिकल बंद होते. तसेच वणी, मारेगाव व झरी तालुक्यातही मेडिकल स्टोअर्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. पर्यायी व्यवस्था असल्याने रग्णांची गैरसोय टळली.

सकाळी 11 वाजता वणीतील टिळक चौकात केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य गोळा झाले. त्यात फार्मसीचे विद्यार्थीही सहभागी झालेत. नंतर टिळक चौकातून सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करीत रॅली निघाली. ही रॅली खाती चौक, गांधी चौक, जत्रा रोड, सर्वोदय चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक असा मार्गक्रमण करत गेली. या रॅलीचा शेवट तहसिल कार्यालयात झाला. इथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सरकारने ऑनलाईन औषधी खरेदीस परवानगी दिल्याने औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय नशेच्या औषधी सहज प्राप्त करता येणार आहे. ऑनलाईन औषधी खरेदीमुळे चुकीची औषधं दिली जातील आणि रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होईल. याबाबत शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ऑनलाईन औषधीच्या विक्रीला परवानगी नाकारावी अशी मागणी देशभरातील औषधी विक्रेत्यांनी केली आहे.

रॅलीमध्ये केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी रवि येरणे, लक्ष्मण उरकुडे, अजय मुनोत, भुषण भेदी यांच्यासह शेकडो औषध विक्रेते तसेच फार्समसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.