सुमीत रामटेकेचा शनिवारी भव्य जाहीर सत्कार

युपीएससीतील यशाने वाढवला शिरपूरचा लौकिक

0

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील सुमीत रामटेके या विद्यार्थ्याची UPSC परीक्षेद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल शिरपूर ग्रामवासियांतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीच्या रंगमंचावर हा भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्थानिक कैलास क्रिकेट क्लब आणि समस्त गावक-यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुमीत सुधाकर रामटेके हा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला. वडील सुधाकर रामटेके हे शिरपूर येथील गुरुदेव शाळेत परिचारक तर आई ज्योत्स्ना रामटेके या गृहिणी. सुमीतचे प्राथमिक शिक्षण शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. मात्र सुमीतमध्ये शिकण्याची जिद्द होती. शहरात शिक्षणाच्या अधिक संधी मिळते या कारणाने त्याने सातवीनंतर शिक्षणासाठी घर सोडण्याचा निश्चय केला व वणीतील जनता शाळेत प्रवेश घेतला. दहावीतही त्याचे यश दिसून आले. पुढील शिक्षणासाठी त्याने थेट नागपूर गाठले. नागपुरातील सोमलवार महाविद्यालयातून त्याने 12 वी केले.

दुसरीकडे घरची परिस्थिती बेताची. सुमीतच्या आईने पॉलिटेक्निक केले होते. त्यांना नोकरीही लागली. मात्र मुलं सुमीत आणि अमीत यांचे शिक्षण आणि सांभाळ योग्यरित्या व्हावा यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. एकीकडे मुलगा शिक्षणासाठी राबत होता तर दुसरीकडे घरखर्च, मुलांच्या शिक्षण यात खंड पडू नये म्हणून वडिलांसोबत त्याची आईही राबत होती. त्याच्या आईने गावातच शिवणकला व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला.

कुटुंबीयांसोबत सुमीत

सुमीत अचानक सर्वांच्या नजरेत आला तो 12 वी मध्ये आयआयटी एन्ट्रन्स परीक्षेच्या निकालनंतर. त्यावेळी जिल्ह्यात केवळ दोन विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरले होते. त्यातला एक म्हणजे सुमीत. एका गावातील मुलगा जिल्ह्यात टॉप करतोय हा सर्वांसाठीच सुखद धक्का होता. पुढे सुमीतने आयआयटी वाराणसी येथे बीटेक साठी प्रवेश घेतला. तिथून त्याने 2015 मध्ये डिग्री पूर्ण केली.

तसं डिग्री झाली की सर्वांना वेध लागते ते नोकरीचे. त्यातल्या त्यात आयआयटी पास झालेल्या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच लाखों रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळते. मात्र सुमीतच्या मनात हा काहीतरी वेगळेच होते. त्याला केवळ पैसे कमवून देणारी नोकरी नाही तर समाज घडवणारी नोकरी करायची होती. ही सिस्टिम बदलवायची असेल तर आधी त्या सिस्टिमचा भाग होणे गरजेचे आहे अशी त्याची धारणा आहे. यासाठी त्याने इंजिनियरिंगच्या तिस-या वर्षीच प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले. त्यात त्याला पहिल्या प्रयत्नातच यश आले.

नुकत्याच युपीएससीच्या जाहिर झालेल्या निकालमध्ये सुमीतची भारत सरकारच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणा-या केंद्रिय सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली. गावात ही बातमी कळताच गावात दिवाळी साजरी झाली. गावक-यांनी उत्स्फुर्तपणे एकत्र येऊन सुमीतचा जाहीर सत्कार करण्याचे ठरवले. उद्या शनिवारी शिरपूर येथील ग्रामपंचायतच्या रंगमंचावर त्याचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे.

‘वणी बहुगुणी’शी बोलताना सुमीत म्हणाला की….

परिसरात अनेक विद्यार्थ्यांकडे क्षमता आहे. मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने आपल्याकडील मुलांना योग्य ती संधी मिळत नाही. गाव खेड्यातील मुलगा शिकला पाहिजे. मोठा झाला पाहिजे यासाठी जी काही मदत लागेल ती मदत आणि मार्गदर्शन करण्यास मी कुठेही कमी पडणार नाही. वाचण, अभ्यास या गोष्टी व्यक्तीला घडवतात. त्यामुळे यावर्षी वणीमध्ये आणि त्यापुढे शिरपूर येथे अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करण्याची इच्छा आहे.

जरी आज सुमीतला अधिकारी बनण्याची संधी मिळाली असली तरी अद्याप नोकरी करायची की एक्स्टेंशन घ्यायचे यावर त्याचा विचार सुरू आहे. कारण सुमीतचे मुख्य ध्येय हे आयएएस ऑफिसर बनण्याचे आहे. सीएपीएफमध्ये रुजू होण्यास आणखी तीन महिण्यांचा कालावधी आहे. या कालावधीत विचार करून योग्य तो निर्णय तो घेणार आहे. जरी नोकरीत रुजू झालं तरी अंतीम ध्येय हे आयएएस ऑफिसर होण्याचंच आहे असंही सुमीतने स्पष्ट केलंय.

त्याच्या या यशानं सर्व गाव आणि परिसर हुरळून गेला आहे. त्याच्यावर सर्वीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुमीत या यशाचे सर्व श्रेय आई वडिलांना देतो. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याच्या पालकांनी त्याला घडवलं. आईच्या त्यागाला तो सर्वाधिक महत्त्व देतो. बाहेर शिकताना नागपूरला असलेली त्याची ताई उज्ज्वला लोखंडे आणि भावजी मिलिंद लोखंडे यांनी त्याला सांभाळले. न्यू व्हिजन आयएएस अकादमी नागपूर व तिथले शिक्षक विजय ढोके यांना ही तो या यशाचे श्रेय देतो. तसेच गावक-यांनी सत्कार घेण्याचे ठरवून जो मान दिला त्यांचे ही तो आभार मानतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.