बहुगुणी डेस्क, वणी: उद्या दिनांक 28 सप्टेंबर शुक्रवारला ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांनी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे वणीतील सर्व मेडिकल बंद राहणार आहे. यासंबंधी केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी तहसिलदार, वैद्यकीय अधिक्षक आणि ठाणेदार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले. हा देशव्यापी बंद असल्याने वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील सर्वच मेडिकल बंद राहणार आहे.
ई-फार्मसीला अधिकृत मान्यता देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नुकताच ई-फार्मसीचा अंतिम मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ई-फार्मसीवर शिक्कामोर्तब झालं आहे. ऑनलाईन औषधी खरेदीमुळे औषध विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान तर होणार आहे. शिवाय नशेच्या औषधी सहज प्राप्त करता येणार आहे. तसेच चुकीची औषधं दिली जातील आणि रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण होईल. याबाबत शासनाने नागरिकांचे हित लक्षात घेवून ऑनलाईन औषधीच्या विक्रीला परवानगी नाकारावी अशी मागणी निवेदनात कऱण्यात आली आहे.
गरुजूंनी आजच औषध खरेदी करण्याचे आवाहन
शुक्रवारी औषध विक्रेत्यांचं बंद आंदोलन आहे. त्यामुळे गरुजू रुग्णांनी आजच आवश्यक औषधी-गोळ्या खरेदी कराव्या. जेणे करून रुग्णांची गैरसोय होणार नाही असे आवाहन औषधी विक्रेता संघटनेचे रवि येरणे यांनी केले आहे. मेडिकल बंद असल्याने रुग्णांना उद्या ग्रामीण रुग्णालयातून औषधी घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भालचंद्र आवारी वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की….
औषधी विक्रेत्यांचा जरी संप असला तरी त्याचा कोणताही फटका रुग्णांना बसू नये याची पुरेपुर काळजी घेण्यात आली आहे. दोन तीन दिवसांआधीच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून पुरेसा औषधी साठा रुग्णालयात आणला गेला आहे. त्यामुळे रुग्णांनी काळजी करण्याचे कारण नाही. उद्या औषधीसाठी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने आज संध्याकाळी कर्मचा-यांची मिटिंग घेऊन त्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहे.
अत्यावश्यक वेळी काय करावे?
गंभीर रुग्णांचे बरे वाईट होऊ नये यासाठी मेडिकल असोसिएशनने काही अत्यावश्यक क्रमांक दिले आहेत.
रवि येरणे – 9881156095, लक्ष्मण उरकुडे – 9372488432, अजय मुनोत – 9823005592, भुषण भेदी – 9822844854
या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास त्यांच्याद्वारे गंभीर रुग्णांसाठी त्वरीत औषधीची व्यवस्था केली जाणार आहे. निवेदन देतेवेळी केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.