कापसावर मिलिबगचा प्रादुर्भाव

शेतकरी चिंतीत, उत्पन्नात घट येण्याची शक्यता

0

विलास ताजने, मेंढोली:  श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पडलेला  पाऊस खरीप पिकांना जीवदान देणारा ठरला आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले होते. मात्र पावसानंतर कापसाच्या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कीड नियंत्रणावर शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांचा आनंद चिंतेत बदलल्याच चित्र दिसून येत आहे.

वणी तालुक्यातील कायर, शिरपूर आणि शिंदोला परिसरातील काही शेतात मावा, तुडतुडे या रसशोषक किडीसह मिलिबग (पिढ्या ढेकूण) या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सदर कीड ढेकणाच्या आकाराची किंचित गोल आणि मऊ पांढऱ्या रंगाची आहे. किडीचा प्रभाव झाडाच्या आणि फांदीच्या शेंड्यावर दिसून येत आहे. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटलेली आहे.

शेतकरी कीड नियंत्रणासाठी कीडनाशके फवारीत आहे. तर काही शेतकरी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून जाळत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जून महिन्यात सात ते दहा तारखेपर्यंत पाऊस पडला. परंतु त्यानंतर पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली. परिणामी मृग नक्षत्राच्या प्रारंभी कापसाची टोबनी न केलेल्या शेतकऱ्यांना दुबार, तिबार टोबनी करावी लागली.

 

काही शेतातील कापूस पिकांवर बोन्ड अळीचे सावट घोंगावत असताना मिलिबगचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकामागून एक येणाऱ्या समस्येमुळे बळीराजा पुरता वैतागलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.