बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेश येथे पळवून नेल्याचे समोर आले आहे. सदर मुलगी ही खासगी काम करत होती. तिच्या सोबत काम करणारी तिच्या मैत्रिणीनेच तिला पळवले. याची माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी पळवून नेणा-या मैत्रिणीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही (वय 16 वर्ष 8 महिने) मारेगाव तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबीयांसह राहते. ती गेल्या काही काळापासून एका कॅटरिंगमध्ये काम करते. तिच्या सोबतच वणी येथील एक मुलगी काम करते. सोबत काम करत असल्याने दोघींची चांगली ओळख व मैत्री आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी पीडिता घरातून कामासाठी वणीला जाते असे सांगून निघाली. मात्र संध्याकाळी ती घरी परतली नाही.
उज्जैनला पोहोचली मुलगी
मुलगी बेपत्ता झाल्यापासून तिचे वडील तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करीत तिचा शोध घेत होते. बुधवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी तिच्या वडिलांना उज्जैन येथील पोलीस स्टेशन मधून एक कॉल आला. कॉलवरून मुलीने तिला तिच्या सहकारी मैत्रिणीने अज्ञात जागी आणून सोडल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने झालेली घटना कथन केली. तेव्हा तिच्या पालकांना ही सर्व घटना कळली. या घटनेमुळे तिचे पालक चांगलेच थरारले.
या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी मैत्रिणी विरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. ( बातमीतील इमेज एआय जनरेटेड आहे.)



Comments are closed.