प्रभाग 14 व प्रभाग 11 मध्ये काँग्रेसची जनसंवाद रॅली !

जनतेशी थेट संवाद; काँग्रेसमध्ये उत्सवाचे वातावरण

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात काँग्रेसच्या प्रचार यात्रेला गेल्या दोन दिवसांत जोरदार प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी प्रभाग 14 मध्ये तर आज शनिवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी प्रभाग 11 मध्ये काँग्रेसची रॅली उत्साहात पार पडली.

शुक्रवारी सकाळी प्रभाग 14 येथील मंदिरातून काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी जत्रा मैदान येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर दीपक चौपाटी परिसर, रंगनाथ नगर, खरबडा या भागांतून वाजतगाजत रॅली निघाली. उमेदवार अंकिता कुळसंगे, अशोक बिलोरिया व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांच्या प्रचारार्थ काढलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी जनतेने स्वागत करून विजयाचा विश्वास व्यक्त केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आज शनिवारी सकाळी प्रभाग 11 मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व टागोर चौक येथे नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली. त्यानंतर रंगारी पुरा, सर्वोदय चौक, सेवा नगर, शिवनेरी चौक, गणेश पूर रोड या भागांतून जनसंवाद रॅली काढण्यात आली. प्रभाग 11 अ मधील काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवार आशाताई टोंगे व प्रभाग 11 ब मधील उमेदवार गुलाम रसूल रंगरेज व डॉ. संचिता नगराळे यांनी रॅलीत अग्रस्थानी होते. 

या रॅलीत आमदार संजय देरकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यकर्त्यांचा उत्साह, महिलांचा सहभाग आणि जनतेचा विश्वास यामुळे प्रचार यात्रेला वेगळेच बळ मिळाले. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले. प्रत्येक गल्ली-प्रत्येक चौकात निवडणुकीचा रंग चढला होता. 

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार
काँग्रेस केवळ विकासाचे राजकारण करते. या निवडणुकीतही आमचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम आहेत. रॅलीच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेचा रॅलीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खात्री आहे की यंदा विजय निश्चित आहे. या निवडणुकीत विजय मिळवून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे. – संजय खाडे, प्रदेश सचिव काँग्रेस

काँग्रेसच्या उमेदवारांनी जनतेशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून विजयाचा विश्वास दिला. त्यामुळे प्रभाग 14 व प्रभाग 11 मध्ये काँग्रेसचा प्रचार जोमात रंगला असून निवडणुकीच्या शर्यतीला वेगळेच चैतन्य प्राप्त झाले आहे. प्रचार रॅलीत काँग्रेसचे प्रमोद वासेकर, राकेश खुराणा, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ बिलोरिया यांच्यासह काँग्रेस, शिवसेना उबाठा व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments are closed.