8 वर्षांची चिमुकली बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: शौचास गेलेली अवघ्या 8 वर्षांची मुलगी घरी परतलीच नाही. दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अवघ्या 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पीडिता ही 8 वर्षांची असून ती मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तिचे आई वडील हे मजूरी करतात. मंगळवारी दिनांक 12 मार्च रोजी पीडितेचे वडील सकाळी 6 वाजताच मुजरीसाठी बाहेरगावी गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला तिच्या आत्याकडे ठेवले. दरम्यान सकाळी 7 वाजता पीडिता ही शौचास गेली. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही.

दुपार नंतर मुलीचे वडील कामावरून घरी आले. ते मुलीला घेण्यासाठी त्यांच्या बहिणीकडे गेले. तेव्हा त्यांच्या बहिणीने शौचास गेलेली मुलगी घरी न परतल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी नातेवाईक तसेच आजूबाजूच्या वस्तीत मुलीचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. दरम्यान त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला.

अखेर मुलीचा कोठेही शोध न लागल्याने पीडितेच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.