विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने याबाबतची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली आहे. वणी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडिता (14) ही कोरंबी मारेगाव येथे राहते. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यातच तिच्या आईचे छत्र हरवले आहे. तिचे वडील मोलमजुरी करून घरचा गाडा चालवतात. तर मोठा भाऊ ट्रकवर चालक म्हणून काम करतो. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पीडितेचे शिक्षण मध्येच थांबले होते. तसेच तिच्या आईचा मृत्यू झाल्याने घर सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही पीडितेवरच होती.
पीडितेच्या घरी वीज कनेक्शन नाही. गुरुवारी ती दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपी कलीम शेख बाबा मियां शेख (47) राहणार कोरंबी मारेगाव याच्या घरी टीव्ही बघण्याकरीता गेली. त्यावेळी आरोपीने पीडितेला तु रोज घरी येत जा मी तुला खायला देतो एवढे बोलून दरवाजा बंद केला व पीडितेशी बळजबरी करण्यास सुरूवात केली. आरोपीचे उग्र रुप पाहुन पीडितेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिचा भाऊ घराजवळच होता. त्याने आरोपीच्या तावडीतून पीडितेला सोडवले.
सायंकाळी पीडितेचे वडील कामावरून घरी आले. त्यानंतर पीडितेने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर वडिलांनी मुलीला हिम्मत देऊन झाल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला व त्याच दिवशी त्यांनी वणी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. आरोपीवर भांदवि नुसार कलम 354, सहकलम 8, बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार, सहकलम 3 (1) डब्ल्यु (1)(2) तसेच ऍट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोउनि अशोक काकडे करीत आहे.