राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणीत बुथ प्रमुखांची बैठक

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीची घोडदौड

0

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी विधानसभा क्षेत्रातील बुथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातून सुमारे 150 बुथप्रमुख हजर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकार, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर मानकर यांनी बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली असून, वणी विधानसभा क्षेत्रात येणा-या तीन तालुक्यातील बुथ बांधणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. याद्वारे सुमारे 150 बुथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून बुथ बांधणीसाठी एक बुथ पंचविस युथ हे तंत्र वापण्यात येत आहे. बैठकीत बुथ प्रमुख त्यांच्या सोबत 25 विस्तारक जोडून त्याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, समस्या सोडवण्यास प्रयत्न करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना जयसिंगजी गोहाकार म्हणाले की बुथ प्रमुख हा अभ्यासू आणि निर्णक्षमता असणारा असतो. ही बुथ कमिटी केवळ निवडणुकीपुरती नसेल. मतदारांच्या समस्या सोडविणे, विकासाची कामे करणे यासाठीही ही कमिटी कार्यरत राहील. बुथ प्रमुख आणि विस्तारक यांनी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाशी जोडण्याची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन गोहोकार यांनी केले.

बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की….

सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन तर आपण लढतच आहोत. सत्तेत नसतानाही आपण त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र बुथ कमिटी सक्षम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणे माहीत असलेल्या व ती जनतेपर्यंत तळमळीने पोहोचविणार्‍या कार्यकर्त्यांनाच बुथ कमिटीवर संधी दिली आहे. त्या संधीचे आता सोने करण्याची जबाबदारी ही बुथ प्रमुखांची आहे.

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसने वणी विधानसभा क्षेत्रात कमबॅक केले असून डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. आता वणी विधानसभा क्षेत्रात 150 बुथ प्रमुखांची नियुक्त्या करण्यात आल्या असून उर्वरित 150 बुथ प्रमुखांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया येत्या तीन चार दिवसांत पूर्ण होत असून येत्या दहा दिवसात उर्वरीत बुथ प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. या कार्यक्रमाला वणी, मारेगाव, झरी तालुका प्रमुख, तालुक्यातील पदाधिकारी, बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.