13 वर्षीय कुमारिका रहस्यमयरीत्या बेपत्ता

घरी जाते म्हणून निघाली अन् घरी पोहोचलीच नाही

बहुगुणी डेस्क, वणी: घरातून मंदिरात गेलेली 13 वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना वणी शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी हे वणीतील रहिवासी आहे. ते त्यांची पत्नी, एक मुलगी व मुलासह वणीत राहतात. 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 5 वाजता ते कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. बाहेर गेले असताना त्यांची मुलगी (वय 13) ही घरीच होती. दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास मुलगी घराबाहेर गेली. मात्र सायंकाळी 4 वाजेपर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन लागत असूनही प्रतिसाद मिळत नव्हता. रात्रीपर्यंत नातेवाईक, मैत्रिणीकडे तसेच वणी शहर परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी मिळून आली नाही.

दरम्यान, घराशेजारील मंदिराजवळील एक परिचिताला ती  दुपारी 3 वाजताच्या सुमारास मंदिरातून बाहेर पडताना दिसली होती. तसेच तिने घरी जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर ती घरी न पोहोचल्याने अज्ञात इसमाने तिच्या अल्पवयाचा फायदा घेत फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करीत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.