बहुगुणी डेस्क, वणी: आजच्या काळात स्मार्ट फोन म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्यात तो हरवला तर मोठी पंचाईत होते. त्यात अनेकजण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवतात. अनेकांचे आर्थिक व्यवहार त्यातून होतात. त्यात अलीकडच्या काळात सायबर क्राईमही वाढत चालले आहे. त्यामुळे मोबाईल हरवल्यावर कुणीही बेचैन, अस्वस्थ होणं स्वाभाविकच. मात्र हा हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून परत दिला की त्या व्यक्तीचा जीव भांड्यात पडतो. असाच एक अनुभव नजिकच्या मुर्धोनीतील एका युवकाने घेतला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार याच वर्षी जानेवारी महिन्याच्या 17 तारखेला लाठीवाला पेट्रोल पंप येथून मुर्धोनी येथील सतीश श्रीराम कारडे यांचा मोबाईल हरवला होता. त्याबाबत त्यांनी वणी पोलीस स्टेशन येथे मोबाईल हरवल्याची रीतसर तक्रार केली होती.
तक्रारीवरून वणी पोलिसांनी मोबाईल हरवल्याची 0043/25 अन्वये नोंद घेऊन C.E.I.R. पोर्टलवरून सदर मोबाईल ट्रेस केला. अर्जदार यांना पोलीस स्टेशन वणी येथे बोलावून ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या हस्ते तो मोबाईल परत करण्यात आला. मोबाईल परत मिळाल्यामुळे अर्जदार यांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यांनी वणी पोलिसाचे आभार मानले.
Comments are closed.