‘दम’ असेल तर वाईन शॉप बंद करून दाखवावे: खा. धानोरकर

खासदार बाळू धानोरकरांचे आमदारांना आव्हान

0

जब्बार चीनी, वणी: वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी पुन्हा जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत तर यावेळी बाजारातील दारू दुकानांना परवानगी नसताना दुकान सुरू कसे असा सवाल उपस्थित करत तक्रार केली आहे. या विषयावर खासदार बाळू धानोरकर आक्रमक झाले असून त्यांनी ‘दम’ असेल तर आमदारांनी दारूचे दुकान बंद करून दाखवावे असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे चार दिवसांआधी सुरू झालेला हा कलगीतुरा येत्या काळात चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.

बुधवारी वणीतील पार्थ वाईन शॉपसह दोन देशी दारूचे दुकान उघडले होते. पार्थ वाईन शॉपवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असे कारण देत आमदारांनी त्याबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्याच रात्री लगेच जिल्हाधिका-यांनी पुढील आदेश दारू विक्रीला परवानगी नााही असा आदेश काढला होता. दारूचे दुकान आपल्या तक्रारीमुळे बंद झाल्याचा दावा करत याचे श्रेय आमदार बोदकुरवार यांनी घेतले होते. मात्र त्यांच्या गोटातील हा आनंद केवळ चार दिवसाचा ठरला. रविवारी जिल्हाधिका-यांनी पुन्हा दारू सुरू करण्याची परवानगी दिली.

ही बाब म्हणजे खासदारांनी आमदारांवर मारलेला ‘नहले पे दहेला’ आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात रंगत आहे. या प्रकरणी केवळ आमदारांना चित करण्यासाठीच खा. बाळू धानोरकरांनी दुकानं सुरू करायला भाग पाडले अशीही प्रतिक्रिया दिवसभर राजकीय वर्तुळात रंगत होती. अशी चर्चा सुरू असतानाच आमदारांनी आक्रमक होत आज पुन्हा दारूच्या दुकानासमोर चक्कर मारत दुकानाची जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली.

बाजारातील दुकान सुरु का?
शहरी भागातील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने सुरू करता येणार नाही असा आदेश असताना वणी शहरातील नगर परिषदच्या भाजीपाला मार्केटलाच लागूनच असलेल्या बाजारपेठतील एक वाईन शॉप व गांधी चौकालगत असलेले दुसरे वाईन शॉप सुरू का? असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिका-यांकडे पुन्हा तक्रार केली.

‘दम’ असेल तर दुकान बंद करून दाखवावे: खा. धानोरकर

आम्ही शासनाने दिलेले सर्व नियम, अटी व शर्ती पाळून दुकान सुरू केले आहे. यात कोणत्याही प्रकारे नियमांचा व सोशल डिस्टन्सिंगचा भंग होणार नाही पुरेपुर काळजी घेतली. ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्यावर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली. मात्र तरी देखील आमदार विनाकारण सुडबुद्धीने वागत असून सुरू असलेल्या कामात ते आडकाठी करीत आहे. जर दम असेल तर त्यांनी दुकान बंद करून दाखवावे. अशी आक्रमक भूमिका खा. बाळू धानोरकरांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त करत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना थेट आव्हान दिले आहे.

ही तर संकुचित वृत्ती – मद्यप्रेमींमध्ये नाराजी
गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा उपस्थित करत वाईन शॉप बंद करण्यासाठी मागणी केली होती. या वेळी त्यांनी वाईन शॉप बाजारात असल्याने बंद करावे असा मुद्दा उपस्थित करत वाईन शॉप बंद करण्याची मागणी केली. वाईन शॉप बाजारात आहे, हा मुद्दा गेल्या वेळीही उपस्थित करता आला असता, मात्र गेल्या वेळी त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला गेला नाही? यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले गेल्याने त्यांनी आता विनाकारण वाईन शॉप बाजारात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या वेळी वाईन शॉप बाजारात असल्याचे निदर्शनास आले नाही का? महाराष्ट्रात कुठेही स्थानिक पातळीवर कोणत्या आमदारांनी दारूच्या दुकानाला विरोध केल्याचे ऐकिवात नाही. मात्र वणीतच असा विरोध का होत आहे असा सवाल मद्यप्रेमी उपस्थित करीत आहे. सध्या इतर महत्त्वाचे मुद्दे असताना आमदारांनी हाच मुद्दा का उचलून धरला आहे? इतर मुद्यांकडे त्यांचे लक्ष नाही का? असा सवाल उपस्थित करत सध्या लॉकडाऊनमुळे राज्याला महसूलाची गरज आहे. असे असताना आमदारांनी परवानगी असलेल्या वाईनशॉप मागे लागणे हे संकुचित वृत्ती दाखवत असल्याचेही प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

या प्रकरणावरून गेल्या चार दिवसांआधी सुरू झालेला हा कलगीतुरा आता आणखी शिगेला पोहोचला आहे. हा कलगीतुरा आता वाढतो की याची भैरवी होणार ? आमदारही हा मुद्दा वाढवणार की दारूचा विषय सोडून इतर महत्त्वाचे प्रशासकीय मुद्दे हाताळेल याकडे आता वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.