बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भात शेतमालाच्या भावावर काँग्रेस फसवणूक करीत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे विदर्भात येऊन खोटे बोलून गेले. ते एका सभेत तेलंगणात सोयाबिनला 6 हजार भाव असल्याची बतावणी करून गेले. मात्र तेलंगणात सोयाबिन पिकतच नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका. भाजपने शेतक-यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतक-यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहे. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमताने निवडून द्या, असे आवाहन भाजपच्या नेत्या माथवी लथा यांनी केले.
त्या वणीत रोड शो साठी आल्या होत्या. यावेळी शासकीय मैदानात झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षावर व उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. त्याआधी वणी मध्ये आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत असलेल्या अलोट गर्दीने वणीकरांचे लक्ष वेधले. यात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.
दु. 12 वाजता शासकीय मैदान येथून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या रोड शोला सुरुवात झाली. ढोलताशा, डफडे, गोंडी वाद्यवृंद, डीजेच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रॅली निघाली. रॅलीतील सजवलेल्या बग्गीत भाजप नेत्या माधवी लथा, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, त्यांच्या पत्नी ललिता बोदकुरवार यांची उपस्थिती होती. त्यानंतर दुस-या बग्गीत भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे एक किलोमीटर लांब ही रॅली होती. खाती चौक, गांधी चौक, काठेड ऑईल मील, टागोर चौक टिळक चौक असा मार्गक्रमण करीत शासकीय मैदान येथे रॅलीची सांगता झाली. त्यानंतर भव्य सभा घेण्यात आली.
यावेळी बोलताना माधवी लथा यांनी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की काँग्रेसच्या सर्व नेत्यांना जहागीरीतून सत्ता मिळाली. त्या नेत्याना काहीही कमवावे लागलेनाही. गरीबांच्या घरात अन्न केले आहे की नाही, त्यांना रोजगार मिळतो आहे की नाही. याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. ज्या लोकांना देशाची संस्कृती माहिती नाही. अशा लोकांच्या हाती अनेक वर्ष सत्ता राहिली. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा -हास झाला. मात्र आता या संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळत आहे, अशी टिका त्यांनी केली. तर उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची हत्या केली असा आरोपही केला. यावेळी त्यांनी वक्फ बोर्डच्या मालमत्तेवर तसेच पाकिस्थान व बांगलादेश येथून होणा-या घुसखोरीवरही जोरदार प्रहार केला.
सभेत आ. बोदकुरवार यांनी वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक विकास झाला. काही कामे अद्याप बाकी आहे. ते कामे पूर्ण करण्यास मतदारांनी एक संधी द्यावी, असे आवाहन मतदारांना केले. यावेळी तारेंद्र बोर्डे, के. सुभाषरेड्डी, संजय पिंपळशेंडे इत्यादींनी आपले विचार सभेत मांडत आमदार बोदकुरवार यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले.
Comments are closed.