सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट

बेरोजगार, गृहिणी, विद्यार्थी टारगेट... कार. बंगला, लाखोंच्या कमाईचे आमिष दाखवून होऊ शकते फसवणूक

निकेश जिलठे, वणी: सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर विवेक बिंद्रा याने ऑनलाईन कोर्सच्या नावाने नेटवर्क मार्केटिंग सुरू केली. मात्र त्याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोप काही विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी केल्याने पुन्हा एकदा नेटवर्क मार्केटिंग चर्चेत आली आहे. कोरोना काळात अशाच एका ऑनलाईन जाहिरात करण्याच्या नेटवर्क मार्केटिंग स्किमने महाराष्ट्रातील लाखो लोकांची फसवणूक केली होती. कधी वस्तू विकून करून, कधी पेज टाईप करून, कधी हर्बल प्रॉडक्ट विकून अशा विविध प्रकारे परिसरातील अनेकांची फसवणूक झाली आहे. शिवाय पैशाचे नुकसान भरून निघेल पण या कामासाठी वेळ दिल्याने जे नुकसान झाले ते वेगळेच. नेटवर्क मार्केटिंगचा पूर्वानुभव वाईट असतानाही आपल्या परिसरात या नेटवर्क मार्केटिंग स्किमचा मोठा सुळसुळाट सुरू आहे. बेरोजगार तरुण-तरुणी, गृहीणी, विद्यार्थी हे मुख्यत: टारगेट असते. अशांना कार, बंगला, उद्योगपती व्हा असे मोठे स्वप्न दाखवून त्यांना स्टार्टर किट खरेदी करायला लावली जाते. यात वस्तू, कोर्स, सॉफ्टवेअर, ऑनलाईन जाहिरात असे काहीही असू शकते. यात सुरुवातीला जॉईन झालेल्या बोटावर मोजता येणा-या व्यक्तींना थोडाबहुत फायदा देखील होतो. मात्र त्याखालच्या लोकांच्या वाटेला केवळ निराशाच येते. हे नेटवर्क मार्केटिंग, एमएलएम, पिरॅमिड स्किम काय आहे? सर्वच कंपनी फ्रॉड, गल्लाभरू आहेत का? फ्रॉड कंपनी ओळखता येते क? यात गुंतवणूक करावी का? याची आपण माहिती घेऊ.

नेटवर्क मार्केटिंग काय आहे?
MLM म्हणजे मल्टी लेव्हल मार्केटिगं. याला नेटवर्क मार्केटिंग म्हणूनही ओळखले जाते. चैन मार्केटिंग, रेफरल मार्केटिंग इत्यादी वेगवेगळे नावं पण याला आहेत. यात थोडाफार फरक आहे. पण याची मुळ कल्पना ही नेटवर्क किंवा चैन तयार करणे हाच आहे. 1995 साली जगात एमएलएमची सुरुवात झाली. यात एका मेंबर्सला काही पैशाची गुंतवणूक करून 3 मेंबर्सना गुंतवणूक करायला जोडावे लागायचे. गुंतवणूक करणारे मेंबर जोडल्यावर जोडणा-या मेंबरला काही कमिशन दिले जायचे. किमान 3 मेंबर जोडले तर गुंतवणूक करणा-याचे सर्व पैसे कमिशनच्या माध्यमातून रिकव्हर व्हायचे. त्याखालील मेंबर आणखी तीन मेंबर जोडायचे. त्याखालचे मेंबर आणखी मेबर जोडणार. विशेष म्हणजे यात मेंबर जोडण्याची मर्यादी नसायची. जेवढे मेंबर जोडले जायचे, त्याची एक पिरॅमिडच्या आकाराची चैन तयार व्हायची. त्यामुळे त्याला पिरॅमिड स्किम म्हटले गेले.

यात वरच्या लेव्हलला ज्या काही बोटावर मोजता येणा-या व्यक्ती फायद्यात राहायच्या, तर खालच्या लेव्हलच्या लोकांचे गु्ंतवणूक केलेले पैसे रिकव्हर होत नव्हते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने जवळपास सर्वच देशात या पिरॅमिड स्किमवर बंदी आणण्यात आली. भारतात देखील याला बंदी आहे. हे ईलिगल आहे. पैशाची गुंतवणूक करून मेंबर बनवण्याला स्किमला पिरॅमिड स्किम म्हणतात. 

पिरॅमिड स्किमला बंदी आल्याने पुढे यात थोडाफार बदल करून हीच स्किम वेगळ्या प्रकारे सुरु करण्यात आली. याला MLM म्हणतात. तर मेंबर व्हा म्हणून मागे लागणारे याला नेटवर्क बिजनेस असे गोंडस नाव देतात. यात स्टार्टर किटच्या नावाखाली काही वस्तू देण्यात येते. याला भारतात मान्यता आहे. मात्र त्यावर सरकारने अनेक मर्यादा आणि नियमावली तयार केली आहे. पण या कंपनीचा मुळात उद्देशच गल्ला भरणे असल्याने या नियमावलीतील पळवाट शोधून आजही हा धंदा सर्रास सुरू आहे. हा व्यवसाय फ्रॉड आहे का? तर जवळपास सर्वच कंपनी फ्रॉड आहेत. फक्त बोटावर मोजता येणा-या दोनतीन कंपनी यात योग्य पद्धतीने काम करीत आहे.

आपल्या भागात ही कधी आली?
माझ्या पाहण्यात ही स्किम सर्वप्रथम 1996-97 च्या दरम्यान आली. चंद्रपूर येथील एक व्यावसायिकाने छोट्या लेव्हलवर ही स्किम लाँच केली होती. अनेक वर्ष झाल्याने एक्झॅट ही स्किम आठवत नाही त्यामुळे ढोबळमानाने ही स्किम पाहू. यात 50 रुपये फि भरून 150 रुपयांचे 3 कुपनचे सेट खरेदी करावे लागायचे. यात 50 रुपये + 450 रुपयांचे कुपनचे 3 सेट अशी 500 रुपयांची गुंतवणूक होती. एका कुपन सेट मध्ये 3 कुपन असायचे. पुढे या मेंबरने 3 मेंबर जुळवले की त्याला एक सोनी कंपनीचा वॉकमन फ्रि मिळायचा. या संपूर्ण व्यवहारात त्याचे 450 रुपये निघायचे. तर 50 रुपये त्याची मेंबरशीप रक्कम जायची. त्यामुळे तो 50 रुपयात वॉकमन मिळाला असे सांगायचा. ही स्किम तेव्हा खूपच लोकप्रिय झाली होती. पण काही काळातच ही स्किम बंद झाली. (कदाचित तुमच्या पाहणीत दुसरी कंपनीही असू शकते.)

त्याच काळात ऍमवे ही परदेशी कंपनी भारतात आली. ही कंपनी प्रॉडक्ट घेऊन बाजारात आली. ही कंपनी खूपच लोकप्रिय झाली. देशात एक व्यवसाय चालला की त्यासारखे शेकडो व्यवसाय येतात. तसेच त्याची कॉपी करून पुढे अनेक कंपनी आल्या. यात स्वदेशी ही बरीच प्रसिद्ध झाली होती. मात्र या कंपनीचा मुळ उद्देश हा प्रॉडक्ट विकणे नसल्याने याचे प्रॉडक्ट हे मार्केटपेक्षा दुपट तिपटीने महाग असायचे. शिवाय अनेक कंपनीच्या प्रॉडक्टचा दर्जा हा सुमार होता. त्यामुळे या कंपनी ज्या वेगात आल्या. त्याच वेगात त्या गायब झाल्या. ऍमवे ही कंपनी अजूनही सुरू आहे. पण त्यांची लबाडी लक्षात आल्याने, लोकांची फसवणूक होत असल्याने, भारत सरकारने या कंपनीला अलिकडेच मोठा दंड ठोठावला व त्याची मालमत्ता जप्त केली आहे.

नेटवर्क मार्केटिंगचा फायदा होतो का?
जगभरातील एक्सपर्टने यावर आपले मत मांडले आहेत. यात त्यांच्या मते केवळ 100 पैकी वर असलेल्या एकाच व्यक्तीला याचा लाभ होतो. तर इतर 99 हे लॉसमध्ये असतात. म्हणजे 1000 लोकांपैकी अवघ्या 10 लोकांचा फायदा होतो. तर इतरांच्या वाटेला केवळ निराशा येते. मोठा वेळ दिल्यानंतर फक्त गुंतवलेले पैसे रिकव्हर होणे हे देखील एक नुकसानच आहे. काहींच्या मते तर नेटवर्क मार्केटिंगपेक्षा कितीतरी पटीने जुगारात जिंकण्याची संधी अधिक असते. (कृपया जुगाराच्या मागे लागू नये) विशेष म्हणजे जी चैन केली जाते त्या चैनच्या 6 लेव्हलमध्येच आपल्या शहराची लोकसंख्या संपते. 7 व्या लेव्हलला जिल्ह्याची लोकसंख्या संपते. 12 व्या लेव्हलला देशाची लोकसंख्या संपते. तर 13 व्या लेव्हलला जगाची लोकसंख्या संपते. 

फ्रॉड कंपनी कशी ओळखावी?
मार्केटिंग कंपनी काही पैशाची गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात स्टार्टर पॅकच्या नावाखाली काही प्रॉडक्ट देतात. त्यामुळे तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनता. तुम्हाला हे प्रॉडक्ट मेंबर बनवून विकावे लागते. प्रॉडक्ट विकण्यापेक्षा मेंबर बनवण्याकडे अधिक भर असल्यास ही कंपनी 100 टक्के फ्रॉड समजावी. प्रॉडक्ट मार्केट रेटपेक्षा दुपटी तिपटीने महाग असणे, सुमार दर्जाचे प्रॉडक्ट असणे, लाखो करोडोंची स्वप्न दाखवणे इ. गोष्टी आढळल्यास ही कंपनी फ्रॉड समजावी.

जेन्युअन कंपनी पण आहेत का?
नेहमीच्या व्यवहारात कंपनी डिस्ट्रीब्युटरला माल पाठवतात. डिस्ट्रीब्युटर कडून हा माल व्यापारी व त्याच्याकडून ग्राहकाकडे येतो. मात्र नेटवर्क मार्केटिंगमध्ये कंपनीकडून माल थेट डिस्ट्रीब्युटर म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतो. आपणच ते प्रॉडक्ट वापरतो व आपणच ते विकतो. म्हणजे आपणच ग्राहक आणि आपणच डिस्ट्रीब्युटर असतो. इथूनच फ्रॉडला सुरुवात होते. टप्परविअर ही डब्बे विकणारी एक प्रसिद्ध कंपनी आहे. ही नेटवर्क मार्केटिंगवर आपले प्रॉडक्ट विकते. मात्र यात प्रत्येक ग्राहक हा डिस्ट्रीब्युटर नसतो. त्यांचे सिलेक्टेड डिस्ट्रीब्युटर आहेत. तसेच ग्राहकांना डब्बा विकत घेतल्यावर आणखी मेंबर तयार करावे लागत नाही. त्यामुळे अशा 2-3 कंपनी या प्रामाणिक आहेत. बाकी या क्षेत्रात फक्त कचराच भरला आहे.

आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. गृहिणींना देखील काहीतरी काम करून कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा असते. विद्यार्थ्याला देखील स्वत:च्या शिक्षणाचा खर्च स्वत: कमवलेल्या पैशातून करावा असे वाटते. असे लोक या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर हेरतात. हे अमक्याला अमुक रुपयाचा चेक आला. तमुक रुपयाचा तितक्या रुपयाचा चेक आला, असे सांगून भुलवण्याचा प्रयत्न करतात. भुलवण्यासाठी वरच्या लेव्हलला काही लोकांचे बँकेचे ट्रान्सॅक्शन दाखवले जातात. पूर्वी चेक दाखवायचे. आम्ही विचारायचो की चेक याला त्याला दाखवत का फिरवतो. चेक बँकेत का टाकत नाही, तर त्याचे उत्तर त्याच्याजवळ नसायचे. कारण हे चेक फ्रॉड असायचे. ते फक्त दाखवायसाठी असायचे.

केवळ वरच्या लेव्हलला असणारे मोजके फायद्यात, इतरांचा फक्त तोटा

नेटवर्क मार्केटिंगवाले मागे लागले तर काय करावे?
हे मार्केटिंगवाले प्रचंड मागे लागतात. त्यांच्या स्किममध्ये जॉईन होण्यासाठी त्यांनाच पैसे उधार मागा. ते पैसे तुम्हाला उधार देणार नाही. मुळात जे मेंबर झाले असतात ते स्वत: फसलेले असतात, मुर्ख बनलेले असतात. त्यांना त्यांचे पैसे रिकव्हर करायचे असल्याने ते आणखी तीन मुर्ख जमवतात. या लोकांचा सर्वात मोठा भ्रम असतो की हे वरच्या लेव्हलला आहेत. मात्र ते सर्वात खालच्या लेव्हलला असतातआणि याची माहिती त्यांना चार सहा महिन्याचा काळ गेल्यावर कळते. पण तो पर्यंत वेळ गेलेला असतो. MLM हा उद्योग किंवा व्यवसाय नाही. यात वेळ घालवण्यापेक्षा इतर लघू उद्योग, गृह उद्योगात वेळ घालवल्यास कमी गुंतवणुकीतून यापेक्षा अधिक परतावा मोठ्या कालावधीसाठी मिळण्याची शक्यता अधिक असते. 

शक्यतो नेटवर्क मार्केटिंगपासून दूरच राहा. यात आपल्या गावातच अनेकांनी आपला उमेदीचा वेळ यात खर्च केला आहे. आपल्या परिसरात एखादा व्यक्ती 10 वर्षांपासून नेटवर्क मार्केटिंगच्या भरवश्यावर आपला उदरनिर्वाह करत आहे का? याची माहिती काढा. उत्तर नाही मिळेल. कंपनी जे प्रॉ़डक्ट विकत आहे. त्याच पद्धतीचे इतर कंपनीचे प्रॉडक्टचा दर किती आहे? याची माहिती काढा. जर मार्केटमधले प्रॉडक्ट दुपटी तिपटीने स्वस्त असल्यास अशा कंपनीपासून दूर राहा. तुम्हाला बीएमडब्यूचे आमिष दाखवण्यात येईल. पण जो तुम्हाला आमिष दाखवतो. त्याने नेटवर्क मार्केटिंगच्या भरवश्यावर साधी मारोती कंपनीची एखादी कार घेतली आहे का? एक महिन्याआधी जॉईन झालेल्या लोकांची कमाई खरच 10 पटीने वाढली आहे का? MLM मध्ये वरच्या लेव्हलच्या लोकांना फायदा होत असल्याने दर वर्षी नवनवीन कंपनी या क्षेत्रात येते. आधीच्या कंपनीचे काय झाले? तुम्हाला जॉईन करणारा कोणत्या लेव्हलला आहे? गावात काही वर्षांपूर्वी MLM केलेल्या लोकांना भेटून ते खरच लखपती झाले का? त्यांचा अनुभव काय होता? याची माहिती काढा. नेटवर, युट्यूबवर MLM मधून झालेल्या फसवणुकीच्या न्यूज सर्च करा. शेवटी पैसे कमवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. टाटा, बिर्ला अशा देशातील टॉपच्या कंपनी नेटवर्क मार्केटिंग का करत नाही? याचा विचार करा? त्यानंतरच नेटवर्क मार्केटिंगमध्ये सामिल व्हायचे का नाही याचा विचार करा. कुणी फसत असल्यास अशांनाही यातून बाहेर काढा…

Comments are closed.