वेकोलीच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : भरमसाठ पगार घेऊनही कामचुकारपणा करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून त्यांना तात्काळ निलंबित करा. अशी मागणी वणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वणी नॉर्थ क्षेत्र) चे मुख्य महाप्रबंधक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

वणी नॉर्थ क्षेत्र अंतर्गत अनेक कोळसा खाणी आहे. केंद्र सरकारच्या अधीनस्थ असलेल्या या कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार दिली जाते. तरीपण काही राजकीय पक्षांशी जुळलेले व युनियन नेता म्हणून वावरणारे तथाकथित कर्मचारी काम न करता फक्त हजेरी लावून पगार उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. या हजेरी बहाद्दर कर्मचाऱ्यांबाबत क्षेत्रीय उप प्रबंधक यांना संपूर्ण माहिती आहे. मात्र राजकीय दबावाखाली या कर्मचाऱ्यांवर कोणतीही अनुशासनात्मक कारवाई केली जात नाही.

धक्कादायक म्हणजे काही दबंग कर्मचारी ड्युटीवर जात नसताना हजेरी रजिस्टरमध्ये त्यांच्या नावापुढे दुसरं कुणीतरी सह्या करत असल्याचे प्रकारही उघडकीस आले आहे. तर काही कर्मचारी फक्त हजेरी लावून परत घरी येतात आणि इतर व्यवसाय किंवा शेती सांभाळतात. गलेलठ्ठ पगार घेऊनही कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याची ओळख पटवून त्यांना निलंबित करा. अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, लकी सोमकुंवर, सूरज काकडे, मनोज बघवा, सौरभ राऊत, राजेंद्र खारकर, अविनाश जुनगरी, आदर्श मडावी या मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास वेकोलीचे नागपूर येथील मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.