बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महिला व्यावसायिक व मनसेच्या पदाधिकारी विद्या सुधाकर हिवरकर (47) यांनी मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्या मनसेच्या संघटिका होत्या. तसेच सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असायच्या. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत विद्या सुधाकर हिवरकर या कनकवाडी येथील रहिवासी होत्या. त्या घरातूनच लेडिज विअर व ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय करायच्या. त्यांचे पती खासगी काम करतात. त्यांची मुलगी नुकतीच नोकरीला लागली असून ती दिल्ली येथे नोकरी करते. तर मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी त्यांचे पती कामासाठी गेले होते. तर त्यांचा मुलगा नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी गेला होता. दरम्यान विद्या या घरी एकट्याच होत्या. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी घरी गळफास घेतला.
दरम्यान त्यांची मैत्रिण व ग्राहक त्यांना दुपारपासून कॉल करीत होती. मात्र त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची एक मैत्रिण ही काय झाले हे पाहण्यासाठी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास विद्या यांच्या घरी गेल्या. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांना विद्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
ही घटना शहरात वा-यासारखी पसरली. वार्डातील व वणीतील अनेक लोकांनी घरी गर्दी केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. विद्या यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.



Comments are closed.