बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील डोंगरगाव (विरकुंड) येथील रहिवासी असलेले सुहास हिंगाने यांनी गुरुवारी रात्री विष प्राशन केले होते. त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून परिसरातील एका तथाकथित पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव पोटवडे असे या भुरट्या पत्रकाराचे नाव असून तो वारंवार सुहास यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होता. त्याला कंटाळून सुहास यांनी आत्महत्या केली, असा आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, सुहास हिंगाने यांच्याकडे 3 एकर शेती होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ते ट्रॅक्टर भाड्याने देण्याचे काम करीत होते. तर त्यांची पत्नी ही विरकुंड गट ग्रामपंचायतची सदस्य आहे. गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी ते ट्रॅक्टरवरच्या मजुरांना सोडण्यासाठी बाहेरगावी गेले होते. दरम्यान गावात परतल्यावर त्यांनाआरोपी वैभव पोटवडे हा भेटला. त्याने सुहास यांच्याजवळ तुम्ही रेतीचे काम करता. त्यामुळे 50 हजारांचा हप्ता सुरु करा, अशी मागणी केली. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास सुहास घरी परतले. त्यांनी घरून विषारी द्रव्य सोबत घेतले व ते शेजारच्या शेतात गेले. तिथे त्यांनी विष प्राशन केले. रात्री 12 वाजताच्या सुमारास ते घरी विष घेतलेल्या अवस्थेत पोहोचले. त्यांना ओकारी सुरु झाल्याने सुहास यांनी विष घेतल्याचे निष्पन्न झाले.
पत्रकारितेच्या आडून ब्लॅकमेलिंग
आरोपी वैभव गजानन पोटवडे हा डोंगरगाव (विरकुंड) येथील रहिवासी असून तो एक पोर्टल चालवायचा. दोन महिन्याआधी त्याने सुहास यांना पत्रकार असल्याचे सांगत धमकी देण्यास सुरुवात केली. तुम्ही रेती तस्करीसाठी ट्रॅक्टर वापरता. मी पत्रकार आहे. ट्रॅक्टरचे फोटो घेऊन कारवाई करतो, 50 हजारांचा हप्ता (महिना) सुरु करा. अन्यथा तुमचा ट्रॅक्टरचा धंदा बंद करतो अशी धमकी त्याने सुहास यांना दिली. त्यानंतर वैभव हा वेळोवेळी सुहास यांना 50 हजारांची खंडणी सुरु करा, असा तगादा लावत होता. ट्रॅक्टरचा व्यवसाय बंद होईल या भीतीने सुहास हे मानसिक तणावात होते.
गावक-यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
सुहास यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त गावक-यांनी संध्याकाळी वणी पोलीस स्टेशन गाठले. गावक-यांनी वैभव पोटवडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच आज मंगळवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी गावक-यांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी वैभव गजानन पोटवडे याच्या विरोधात बीएनएसच्या कलम 108 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वणीत भुरट्या, ब्लॅकमेलर पत्रकारांचा सुळसुळाट
पत्रकारितेचे कोणतेही शिक्षण घेतलेले किंवा पत्रकारितेचा कोणताही पूर्वानुभव नसलेले, साधी बातमी लिहिता येत नसतानाही काही भुरटे लोक पोर्टल व यूट्यूब चॅनल काढून परिसरात पत्रकार म्हणून मिरवत आहेत. ‘कॉपी-पेस्ट’ पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा ‘धंदा’ केला आहे. काही बोगस पत्रकारांनी तर केवळ खंडणी वसुल करण्यासाठीच पोर्टल, यूट्यूब चॅनल सुरु केले आहे. आधी वणीत सुरु असलेला प्रकार आता खेडोपाडी देखील पोहचत आहे. अशा बोगस, खंडणीबाज पत्रकारांचा परिसरात चांगलाच सुळसुळाट झाला असून अशा भुरट्यांमुळे सर्वसामान्य, व्यावसायिक, अधिकारीवर्ग चांगलाच त्रस्त झाला आहे. त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुहास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. गावक-यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी रेटून धरली आहे. वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक झालेली नव्हती.



Comments are closed.