वणीकरांना मलमूत्र मिश्रित पाणीपुरवठा? मनसेच्या व्हिडीओने खळबळ

राजू उंबरकर यांचे 'सही' आंदोलन, स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांना नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी  मलमूत्रयुक्त आहे. तसेच पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुद्ध केले जाते, असा दावा मनसेने एक व्हिडीओ जाहीर करून केला आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनसे आक्रमक झाली असून यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी दिला.

वणीत छ. शिवाजी महाराज उद्यानाजवळ फिल्टर प्लान्ट (वॉटर सप्लाय) आहे. या ठिकाणाहून पाणी शुद्ध करून ते नळाद्वारे वणीकरांना पुरवले जाते. मात्र हे पाणी शुद्ध करण्यासाठी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा या प्लान्टमध्ये बसवण्यात आलेली नाही. तसेच हा प्लान्टच घाणीच्या विळख्यात असून पाणी साठवलेल्या टाक्या अस्वच्छ आहेत. वणी शहरातील लोकसंख्या वाढली. मात्र पाणी स्वच्छ करण्याची कोणतीही अद्ययावत यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली नाही. असा आरोप उंबरकर यांनी केला आहे.

काय आहे मनसेचे फॅक्ट चेक?
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठ्याबाबत फॅक्ट चेक केले. काही कार्यकर्ते निर्गुडा नदी येथे गेले. नदीत ज्या ठिकाणी पाण्याचा पम्प बसवला आहे. त्या पम्प शेजारीच शहरातील सांडपाणी मिसळते. या पम्पमधून पाणी वॉटर सप्लाय (फिल्टर प्लान्ट) येथे पाठवले जाते. या केंद्रात पाणी शुद्धीकरणासाठी बसवण्यात आलेली यंत्रणा अतिशय निकृष्ट आहे. फिल्टर पाण्याची टाकी पुरेशी साफ केलेली नाही. या टाकीशेजारीच घाणीचे साम्राज्य आहे. पाणी फिल्टर करण्यासाठी केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर होत आहे, असा दावा मनसेने व्हिडीओतून केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीकरांच्या प्रश्नावर ‘सही’ मोहीम सुरु…
वणीकरांनी अशुद्ध आणि मलमूत्र युक्त पाणी प्यायचं का? नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार पालिकेला कुणी दिला? याला जबाबदार असणा-यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत स्वाक्षरी मोहीम मनसेतर्फे सुरु झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने वणीकरांना या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येणार, असा इशारा देखील राजू उंबरकर यांनी दिला आहे.

Comments are closed.