बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील जैत्रा मैदानावर लागणारा बैलबाजार केवळ संपूर्ण विदर्भातच नाही तर परराज्यातही प्रसिद्ध आहे. दूरदुरून शेतकरी व पशूपालक जनावरं विकत घेण्यासाठी वणीच्या बैलबाजारात येतात. होळीनंतर या बैलबाजाराला अधिक रंग चढतो. मात्र या बैलबाजारात विरजण आणण्याचे काम आता चोरटे करू लागले आहेत. तेलंगणातून बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतक-याचा मोबाईल एका चोरट्याने भरदुपारी हिसकावून नेला. या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तक्रारीनुसार, उमेश दयालाल चौधरी (35) हा ता. जैनत जि. अदिलाबाद तेलंगणा येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे. सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी तो त्याच्या मित्रासह वणीत बैल पाहण्यासाठी आला होता. दुपारी सव्वा 2 वाजताच्या सुमारास तो जत्रा मैदानात बैल पाहण्यासाठी फिरत होता. दरम्यान त्यांच्या जवळ दुचाकी चालवत एक तरुण आला. काही कळायच्या आतच त्या दुचाकी चालकाने उमेशच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.
अचानक झालेल्या मोबाईल स्नॅचिंगमुळे उमेश गोंधळला. तो आरडाओरड करीत दुचाकी चालकाच्या मागे धावला. मात्र दुचाकी चालक भरधाव तिथून दीपक टॉकीज चौपाटीच्या दिशेने पळून गेला. उमेश याने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 304 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
विना नंबरप्लेटची दुचाकी
सदर चोरटा हा काळ्या रंगाची स्प्लेंडर घेऊ आला होता. विशेष म्हणजे या चोरीत चोरट्याने विना नंबरचे वाहन वापरले. विना नंबरचे वाहन वापरून मोबाईल स्नेचिंगची ही घटना चिंता वाढवणारी आहे. सद्या बैल बाजारामुळे वणीत मोठ्या प्रमाणात राज्यभरातूनच नाही तर परराज्यातूनही शेतकरी व पशूपालक येतात. अशा चोरीच्या घटनामुळे बैल बाजार पाहायला येणा-या ग्राहकांवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.
Comments are closed.