मारेगाव येथील दोन पत्रकार व शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

खोटा गुन्हा दाखल केल्याचा पत्रकार संघटनेचा आरोप... ठाणेदारांविरोधात बातम्या लावल्याचा वचपा काढण्यातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव येथील दोन पत्रकारांवर व एका शिक्षकावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल करणा-या तत्कालीन ठाणेदारांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघ या पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे. सदर प्रकार हा सुनियोजीत व षडयंत्राचा भाग असून या षडयंत्रात पुढाकार घेणा-या एका तथाकथित पत्रकाराची व एका नगरसेवकाची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेनी केली आहे. दरम्यान ठाणेदारांविरोधात बातम्या लावल्याचा वचपा काढण्यातून हा प्रकार झाल्याचा आरोप होत असून, अशी चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगत आहे. दरम्यान आज सोमवारी या प्रकरणी मारेगाव येथील पत्रकारांनी यवतमाळ येथे पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.

मारेगाव येथील पोर्टलमध्ये बातमीदार म्हणून काम करणा-या पत्रकारावर व पं.स. मारेगाव येथे कार्यरत शाळेतील एका शिक्षकावर दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विनयभंगाची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी 29 फेब्रुवारी रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात यामुळे एकच खळबळ उडाली होती.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?
तक्रारकर्ती महिला ही महिला एका शाळेत शालेय पोषण आहार तयार करण्याचे काम करते. मात्र गैरवर्तवणुकीमुळे शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन कामावरून काढून टाकले. त्यामुळे सदर महिलेने शहरातील एका तथाकथित पत्रकार व एका नगरसेवकाला हाताशी धरत खोटी तक्रार दाखल केली. या प्रकरणी तत्कालीन ठाणेदार खंडेराव यांनी कोणतीही शहानिशा न करता या प्रकरणी गुन्हा दाखल केला, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाला खतपाणी खालणा-या तथाकथित पत्रकारावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून त्याला तुरुंगवारी देखील झाली आहे. तर या प्रकरणात पुढाकार घेणारा नगरसेवक याच्यावर लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान परिसरात चालणारे विविध अवैध धंदे याविरोधात बातम्या लावून तत्कालीन ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानेच गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होत असून याबाबत सध्या शहरात रंगत आहे.

Comments are closed.