दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा
● सोनेगाव येथील मध्यस्थीसह परप्रांतिय व्यापाऱ्यांविरुद्ध मुकुटबन ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार
सुशील ओझा, झरी: 15 दिवसात दहापट रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा घालणारे दोन परप्रांतीय व्यापारी व मध्यस्थी इसमाविरुध्द पीडित शेतकऱ्यांनी मुकुटबन ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार नोंदवली आहे. तालुक्यातील सोनेगाव, रुईकोट व भेंडाळा गावातील 11 शेतकऱ्यांनाकडून 2 लाख 20 हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार काही परप्रांतीय व्यापारी खेड्यापाड्यात फिरुन ब्लॅंकेट, चादरी, रेनकोट विक्रीचा व्यवसाय करतात. सदर व्यापारी ग्राहकांना उधारीत माल विकून काही महिन्यानंतर वसुली करत होते. मागील अनेक वर्षांपासून घोंसा येथे मुक्कामी परप्रांतीय व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागात चांगली ओळख निर्माण करुन लोकांचा विश्वास संपादन केला. फक्त वस्तूच नव्हे तर शेतकऱ्यांना बी बियाणे व खत खरेदीसाठी व्याजावर पैसे देण्याचा धंदाही या व्यापाऱ्यांनी सुरु केला. त्यामुळे लोकांचा आणखी विश्वास या ठकबाज व्यापाऱ्यांवर बसला.
लोकांचा आपल्यावर विश्वास असल्याचा फायदा घेऊन या ठकबाजानी सोनेगाव येथील एका व्यक्तीला हाताशी धरुन 15 दिवसात दहापट रक्कम मिळण्याची अफवा पसरवली. मध्यस्थ व्यक्ती सोनेगाव येथील तुळशीराम जुमनाके यांच्यामार्फत व्यापारी शहाबुद्दीन खान व फकरू मुन्शी खान यांनी 11 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 20 हजार प्रमाणे 2 लाख 20 हजार रुपये जमा केले. 15 दिवसानंतर शेतकऱ्यांनी मध्यस्थी तुळशीराम जुमनाकेकडे 2 लाख रुपये प्रत्येकी मागणी केली. मात्र पैसे घेणारे दोन्ही व्यापारी सणासाठी राजस्थान जाऊन असल्याचा भूलथापा तुळशीराम यांनी लोकांना दिला.
दिलेली मुदत संपून 4 महिने झाले तरी शहाबुद्दीन खान व फकरू मुन्शी खान परत आले नाही. पैसेसाठी काही लोकांनी वरील दोन्ही व्यापाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता दोघांचे मोबाईल स्विच ऑफ होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनेगाव, रुईकोट व भेंडाळा येथील 11पीडित लोकांनी 18 जुलै 2021 रोजी मुकुटबन ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 09 ऑगस्ट रोजी पीडित शेतकऱ्यांनी पैसे जमा करणारा मध्यस्थ व्यक्ती तुळशीराम जुमनाके (60) रा. सोनेगाव विरुध्द दुसरी तक्रार दाखल केली.
मध्यस्थ तुळशीराम जुमनाके याची चौकशी करून परप्रांतीय व्यापाऱ्यांना अटक करावी. तसेच शेतकऱ्यांची मूळ रक्कम मिळवून द्यावं, अशी तक्रार बाबाराव उईके, बेबी येलादे, गजानन वैद्य, बालू बरडे, वामन कोडापे, गजानन चंदनखेडे, किशोर क्षीरसागर, बंडू चिकराम, सतिश मंदावार, विजय केळझरकर व कवडू बरडे या पीडित शेतकऱ्यांनी केली आहे .
परप्रांतीय व्यापाऱ्यांनी वणी मारेगाव व झरी तालुक्यातील 53 लोकांची अश्याच प्रकारे फसवणूक करून 11 लाखाच्या जवळ रक्कम गोळा केल्याची चर्चा आहे. सदर आरोपींचे शोध घेऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळवून देण्याचे आवाहन मुकुटबन पोलीस समोर आहे.