सुसाट बाईकस्वाराची महिलेच्या मोपेडला धडक
वणी (रवि ढुमणे): वणी नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ सुसाट दुचाकीस्वाराने समोर असलेल्या महिलेच्या मोपेडला कट मारल्याने मागे बसलेली महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळचे सुमारास घडली आहे. मात्र वणी वाहतूक उपशाखा सुसाट बाईकस्वारांना लगाम लावण्यात सपशेल फेल ठरल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
बुधवारी सायंकाळी नांदेपेरा मार्गावरील लॉयन्स कॉन्व्हेंटमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम असल्याने पालक वर्ग मुलाचे कार्यक्रम बघायला गेले होते. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वासेकर यांची पत्नी रुपाली ही नणंद च्या मोपेडवर बसून शाळेत गेली होती. मोपेडवर दोघी येत असतानाच मागून येणाऱ्या सुसाट बाईकस्वारांने रुपलीच्या मोपेड ला कट मारला त्यात तोल गेल्याने दोघीही खाली पडल्या यात रुपलीच्या डोक्याला जबर मार बसला.
रुपालीला तात्काळ वणी येथिल सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. असे प्रकार दिवसाआड घडत आहेत मात्र येथील वाहतूक विभाग केवळ सामन्यांना वेठीस धरून सुसाट बाईकस्वार व अवैध प्रवासी वाहने आणि बेशिस्त वाहतुकीला जणू खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे.
वणी शहरात जिल्हा वाहतूक शाखा आहे. शहरात अवैध प्रवासी वाहतूक कोळशाचे ट्रक बायपासवर विरुद्ध मार्गावर उभे असलेले कोळशाचे ट्रक यांना मुभा देत येथील वाहतूक शाखेचे अधिकारी सामान्य लोकांच्या वाहनावर कारवाई करतांना दिसत आहे. बायपास रोडवर तर ट्रकच्या रांगा लागल्या असतांना अद्याप त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास येथील वाहतूक शाखेचे हात अद्याप धजावले नाहीत. तर शहरात सुसाट बाईकस्वार वाहन सुसाट चालविण्याची जणू पैज लावत असताना त्यांना लगाम लावण्यात अद्याप वाहतूक शाखेला यश आलेच नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.