सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दिग्रस (पाटण) येथील सधन शेतकरी तथा सरपंच निलेश येल्टीवार हे आपल्या शेतात सकाळी फेरफटका मारण्याकरीता गेले शेतात फिरताना त्यांना थंडीमुळे झाडात आसरा घेतलेल्या अवस्थेत मोर आढळला. त्यांनी मोराला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण थंडीमुळे मोराला उडता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी मोराला पकडून आपल्या घरी आणले.
घरी मोराची नीट बघितल्यावर त्यांना मोर जखमी असल्याचे आढळले. येल्टीवार यांनी त्वरित डॉक्टरला बोलावून त्याचा उपचार केला व आपल्या मित्राला घरी बोलावले. त्यांनी मोराला वनविभागाच्या स्वाधीन करण्याचे ठरविले.
राष्ट्रीय पक्षी मोराला पाटणबोरी येथील वनविभाग कार्यालयात नेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेरे यांच्या कडे सोपविण्यात आला ज्यामुळे मोर पक्षीचे प्राण वाचले व त्याला जीवदान मिळाले. वनविभागाला मोरपक्षी स्वाधीन करतेवेळी निलेश येल्टीवार, संदीप बुरेवार, नागोराव उरवते, हरिदास गुर्जलवार, श्रीकांत बोदेवार उपस्थित होते.
मोर पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असून त्याची शिकार करणे किंवा मारणे हा गुन्हा आहे. परंतु जंगल परिसरात मोर, चितळ, हरण व इतर पक्षी व प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या पक्षांची व जनावरांची शिकार करून हिस्से पाडून विक्री देखील केली जाते. हे खाण्या-यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
जंगलात किंवा शेतात जंगली जनावर किंवा पक्षी दिसले की त्याची शिकार करून ते खाणा-यांची संख्या कमी नाही. मात्र जखमी असलेल्या मोरावर उपचार करून त्याला वनविभागाच्या स्वाधीन करून मोराला जीवदान दिल्यामुळे येल्टीवार यांचे परिसरात कौतुक होत आहे.