बहुगुणी डेस्क, वणी: चोरही आजकाल काय पराक्रम करतील याचा भरवसा नाही. चोरी करण्याकरता जीवावर उदार व्हायलाही मागे पुढे पाहत नाही. सामान्य माणूस उघड्यावर असलेल्या वीज तारांच्या किंवा मशिनरीच्या जवळ जायलाही घाबरतो. मात्र या चोरट्यानं शनिवार दिनांक 17 मे रोजी तिथून बोरवेल सुरू करण्याची अख्खी पेटीच आणि बरंच काही क्षणात गायब केलं.
तक्रारीनुसार कायर जवळील बाबापूर येथे राहणारे स्वप्निल पुरुषोत्तम पायघन यांचं पिंपरी शिवारात गट नंबर 227 मध्ये शेत आहे. शेतात ओलीत करण्याकरता त्यांनी तिथं बोरवेल मारली. यावर्षी जानेवारी महिन्यात तिथं मोटर बसवली. मात्र एप्रिल महिन्यातच चोरट्यानं केसिंग पासून केबल कापली. शनिवार दिनांक 17 मे रोजी चोरट्यानं तर हद्दच केली. बोअरवेल सुरू करण्याची अख्खी पेटीच त्यानं हातोहात गायब केली. त्यासोबतच अंदाजे 70 फुटांचा मोटरला जोडणारा केबल म्हणजेच सर्विस वायरही लंपास केला. इथला वीज पुरवठा कधी सुरू असतो? कधी बंद असतो? याची संपूर्ण माहिती चोराने आधीच घेतली असावी.
या चोरीमुळे शेतमालक स्वप्निल आणि त्यांचे वडील पुरुषोत्तम नारायण पायघन एका वेगळ्याच काळजीत पडले. पुरुषोत्तम पायघन यांनी पोलीस तक्रारीत नमूद केलं, की फिटिंग केलेल्या वीज तारा चोरणं हे अतिधाडसाचं काम आहे. वीज पुरवठा अचानक सुरू झाला तर कुणाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे अशा विचित्र प्रयत्नांत कुणाच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही. असं त्यांनी तक्रारीतच घोषित केलं. अशा या विचित्र चोरीनं परिसरातील इतरही शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे.
Comments are closed.