केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल
वणी/विवेक तोटेवार: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष तसेच अनेक सामाजिक कार्यात सहभागी असणारे रवींद्र येरणे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या अभियंत्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रवींद्र येरणे यांचे गांधी चौकात येरणे मेडिकल या नावाने मेडिकल स्टोअर्स आहे. त्या मेडिकल स्टोअर्सचे लाइट बिल मार्च 2017 पासून थकीत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीने वेळोवेळी वीज भरणा करण्याबाबत सूचना केली. परंतु रवींद्र येरणे यांनी विजेचा भरणा केला नाही. तसेच वीज वितरणाच्या कार्यालयात जाऊनही वाद घातला. शेवटी कंपनीचे अभियंता व कर्मचारी विष्णू देरकर, अरविंद कापसे व तंत्रज्ञ यांनी नोटीस जारी केली. ती नोटीस त्यांनी मेडिकलच्या शटरवर लावली.
त्यानंतरही येरणे यांनी विजेचा भरणा केला नाही. वीज खंडित करण्यासाठी मंगळवारी दुपारी 2 वाहताच्या सुमारास मंडळाचे कर्मचारी गेले असता त्यांना वीज खंडित करू दिली नाही. शिवाय कर्मचारी व अभियंता शेषराव बळीराम जाधव यांना शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप जाधव यांनी केला आहे.
मंगळवारी रात्री जाधव यांनी येरणे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याबाबत व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करीत वणी पोलिसात रवींद्र येरणे यांच्यावर कलम 353, 294, 506 भा द वि नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पो उ नि मुरलीधर गाडामोडे व सहकारी सचिन गाडगे करीत आहे.