मुकुटबनमध्ये संचारबंदीत फिरणाऱ्या 25 दुचाकीस्वारांवर कारवाई
ठाणेदारांचे विनाकारण घराबाहेर न निघण्याचे आवाहन
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पोलिसांनी 25 दुचाकीचालकांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. सध्या राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. मात्र संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवून काही लोक विनाकारण गाडीने फेरफटका मारत होते. त्यामुळे त्यांच्यावर ही करवाई करण्यात आली.
वेळोवेळी आवाहन केल्यावरही विनाकारण बाईकने फिरणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर मुकुटबन पोलीस ठाण्याने याविरोधात कडक पावले उचलण्याचे ठरवले. आज ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बंदोबस्त लावला व विनाकारण फिरणा-या 25 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.
यावेळी ठाणेदार यांच्यासोबत एएसआय सुरपाम, मोहन कुमरे, जितेश पानघाटे, कुमरे, प्रदीप कवरासे, होमगार्ड प्रजोत ताडूरवार, अविनाश वाघाडे, निकेश घुगुल इत्यादी उपस्थित होते. ठाणेदार सोनुने यांनी नागरिकांना विनाकारण घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन सुद्धा केले.