बंटी-बबलीचा सुरू गेम, नगर पंचायतीचा त्यांच्यावर नेम

मारेगावात एका महिलेल्या मृत्यूनंतर नगर पंचायत सक्रीय

भास्कर राऊत, मारेगाव: शहरात श्वानांच्या उपद्रव्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत नगरपंचायतीकडे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. पालिकेला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. अखेर नगर पंचायतीने याचे टेंडर काढले. यात गेल्या दोन दिवसात सुमारे 150 कुत्रे पथकाने पकडले. मात्र यात भटक्यां कुत्र्यांसह पट्टा नसलेल्या काही पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे. यात बंटी, बबली, चिंटू, मिंटू अशी नावे असलेली कुत्रे आहेत.

मारेगाव नगर पंचायतीने श्वान पकडण्याच्या दिलेल्या टेंडरप्रमाणे तालुक्यात श्वान पकडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पहिल्याच दिवशी 50 श्वान पकडलेत. दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरु होती. दुपारपर्यंत 80 ते 90 श्वान पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन दिवसांमध्ये 150 च्या जवळपास श्वान पकडल्याने मारेगावकरांनी सुटकेचा श्वास घेतला.  नागपूर येथील श्वान पकडणारी टीम मारेगाव येथे दाखल झाली आहे. पिंजरा व जाळी घेऊन पथकाने शहरात ठिकठिकाणी फिरून बेवारस दिसणारे, तसेच आजारी श्वानांना पकडणे सुरु केले आहे.
    
नगरपंचायतीनुसार शहरात जी श्वानं मिळतील, त्यांना पकडून त्यांना लस दिली जाईल. जेणेकरून त्या श्वानांना असलेले रोग दूर होतील. त्यांची नसबंदीसुद्धा होईल. ही मोहीम तीन दिवस चालणार आहे. नागपूरवरून बोलावलेल्या या पथकाकडून श्वानमुक्त शहर आणि रोगमुक्त शहर मोहीम राबविणे सुरु आहे. एका श्वानाला पकडण्याचे बिल 1600 रुपये याप्रमाणे ठरलेले आहे.

या मोहिमेअंतर्गत ज्यांच्या पाळीव श्वानांना बेल्ट नाही, त्या श्वानांनाही पकडत असल्यानं श्वानमालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यात बंटी, बबली, चिंटू, मिंटू अशी नावे असलेली श्वानं पकडून त्यांनाही लस देण्याचं काम सुरु आहे. या मोहिमेवर अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

का सुरु करण्यात आली ही मोहिम?
मारेगाव शहरात काही दिवसांपूर्वी एका श्वानाने चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये नगरपंचायतीवर रोष व्यक्त केला जात होता. तसेच शहरात निरनिराळ्या भागांत मोकाट श्वानांचे साम्राज्य होते. अनेकांना विविध प्रकारे या श्वानांचा त्रास होता. यात मोकाट श्वानांसोबतच बिगर पट्ट्याचे असणारे घरगुती श्वानही असायचे. त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या मारेगावकरांनी या मोहिमेवर आनंद व्यक्त केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.