विलास ताजने, वणी: दोन सख्खे भाऊ. कधी लळा होता. जिव्हाळा होता. परिस्थीती बदलली. मोठा वाईट मार्गाला लागला. दारू पिऊन तो घरी आला. शाब्दिक चकमक झाली. अखेर लहान भावाने मोठ्या भावाचा गळा दाबला. मोठा भाऊ मरण पावला. लहान्याने स्वत: पोलिसांत तक्रार दिली.
दारू पिऊन मोठा भाऊ पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टने या खुनाचे रहस्य उलगडले. गळ्यावरील डागांमुळे हा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला. शिरपूर पोलिसांना आरोपी समीर अशोक जुनगरी (19) यास सख्खा भाऊ स्वप्निल (24) याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. ही घटना शनिवारी सायंकाळी शिरपूर हद्दीतील पुनवट येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पुनवट येथे शनिवारी सायंकाळी स्वप्नील अशोक जुनगरी (24) हा दारू पिऊन घरी आला. यावेळी लहान भाऊ समीर उर्फ नागेश अशोक जुनगरी (19) याला शिवीगाळ करू लागला. स्वप्नील हा दारूच्या नशेत असल्याने आक्रमक होऊन लहान भावाला मारहाण करू लागला. शेवटी भांडण विकोपाला गेले.
दोघात कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान मारहाणीत स्वप्नीलचा मृत्यू झाला. सदर घटनेबद्दल गावात माहिती होताच खळबळ माजली. शेवटी रात्री 10 वाजता समीरने शिरपूर पोलीस ठाणे गाठून मोठा भाऊ स्वप्नील हा दारुच्या नशेत पडून मृत्यू पावला, अशी तक्रार पोलिसात दिली.
यावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविला.हा खून गळा दाबून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शवविच्छेदन अहवालात स्वप्नीलचा मृत्यू नसून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ठाणेदार अनिल राऊत यांनी संशयित आरोपी समीर जुनगरी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भा.दं.स. कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.
घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे व बीट जमादार प्रवीण जुणूनकर करीत आहेत. मृतक स्वप्नील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तसेच त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहे. तो एका गुन्ह्यात यवतमाळ कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची पॅरोलवर सुटका झाली होती.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)