धक्कादायक…. चिलईच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा परस्पर केला व्यवहार

प्रशासकीय यंत्रणेचा प्रताप अन् शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप

0

तालुका प्रतिनिधी, वणी: पिढ्यानपिढ्या मालकी हक्काच्या आणि वहिवाट सुरू असलेल्या शेतजमिनी एका डोलोमाईट व्यावसायिकाला प्रशासनाने परस्पर लिजवर करून दिल्याचा धक्कादायक प्रकर उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वणी तालुक्यातील चिलई येथील शेतकरी चालू हंगामात खरीप पिक कर्जासाठी सातबारा काढण्यासाठी गेले असता सातबारा हातात पडताच सदर संतापजनक प्रकार उघडकीस आला. संबंधित शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन भूमिहीन करण्यात आले. या गंभीर प्रकरणात संबंधित तालुका प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी गुंतले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

वणी तालुक्याच्या टोकावर असलेले चिलई गाव. बहुतांश लोकांचा शेती व्यवसाय. गावाला लागून विदर्भा नदी. भूगर्भातही पाण्याची पातळी वर असल्याने जलसिंचनाची सोय उपलब्ध आहे. अशा गावशिवारात डोलोमाईटचा शोध लागला आणि व्यवसायिकांची त्यावर नजर पडली. चिलई येथे वणी येथील एका व्यावसायिकाने महादेव बोबडे, मारोती बोबडे यांच्याकडील अंदाजे 12 एकर जमीन 20 वर्षांपूर्वी खरेदी केली. मात्र त्यानी उभारलेला डोलोमाईटचा व्यवसाय अल्पकाळात गुंडाळला.
परिसरात डोलोमाईटचा साठा असल्याने व्यवसाय उभारणीसाठी पर्यावरण विभागाने 2015 ला वणीला आणि 2019 ला चिलईला जनसुनावणीचे आयोजन केले होते. मात्र शेतीला योग्य भाव दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांनी खाणं प्रकल्पाला जमिनी देण्यास नकार दिला. परंतु शेतकऱ्यांची आजतागायत वहिवाट सुरू आहे. मात्र सदर जमिनीवर डोळा असणाऱ्या व्यावसायिकाने युक्ती लढवीत शेेेतजमीन आपल्या पदरी पाडून घेतली.
चिलई येथील गट क्र. 22, 23, 24, 29, 32, 33, 34, 35, 36, 37, 40 यातील एकूण क्षेत्र 61•91 हेक्टर आर शेतकऱ्यांच्या मालकी हक्काची शेतजमीन मंत्रालय प्रशासनाने महाराष्ट्र शासन यांचा आदेश क्र. MMN – 2099 / 7707 desk – 4, trade commerce and mining department mantralaya  Mumbai  दि.08 / 01 / 2001 नुसार मोहम्मद अब्दुल कदिर मोहम्मद हनिफ रा. वणी यांना 30 वर्षांकरिता डोलोमाईट खनिजसाठी (लीज) कायदेशीर करार करून देण्यात आली. त्याअनुषंगाने स्थानिक तहसिलदार यांनी संबंधित व्यावसायिकाने केलेल्या अर्जावरून शेतकऱ्यांच्या मालकी हक्कातील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ईतर अधिकारात नोंद घेण्याचे आदेश तलाठ्याला दिले. 
सदर जमिनी लीजवर देण्याबाबतचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र संबंधित शेतकऱ्यांची सहमती नव्हती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन पिढ्यानपिढ्या वहिवाट आणि मालकी हक्काची शेतजमीन प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करीत व्यावसायिकाच्या पदरी पाडली. प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रतापामुळे शेतकरी दिलीप पावडे, गजानन भोयर, विजया भोयर, नामदेव धगडी, जीवन झाडे आदी शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.
चिलई येथील सदर शेतकऱ्यांच्या जमिनीवरील लीज रद्द करावी. शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी स्वतःच्या आर्थिक हव्यासापोटी व्यावसायिकांच्या घशात घालणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिलई येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
ही तर आमची फसवणूक – शेतकरी
जमिनी डोलोमाईट प्रकल्पासाठी लिजवर देण्यासंदर्भात पर्यावरण विभागाने दोनदा जनसुनावणी घेतली. मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पास जमिनी देण्यास संबंधित सर्व शेतकऱ्यांचा विरोध होता. जमिनी आमच्या मालकी हक्काच्या आहेत. त्या देणे अथवा न देणे आमचा हक्क आहे. सध्यस्थीतीत आम्ही जमिनी विकलेल्या नाही. किंवा संबंधित व्यावसायिकासोबत कोणताही करार अथवा आर्थिक व्यवहार झालेला नाही. आमची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणात गुंतलेल्या संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि संबंधित व्यावसायिकावर योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. – जीवन गजानन झाडे, अन्यायग्रस्त शेतकरी रा. चिलई, ता. वणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.