ही बाग फुलांनी बहरेल पुन्हा…
लोकसहभागाने 20 वर्षांपासून बंद असलेल्या बालोद्यानाचा बदलला चेहरा
निकेश जिलठे, वणी: वणीतील नगर पालिकेचं उद्यान… वणीत असलेली एकमेव बाग… सुटीमध्ये बालगोपालांचे खेळण्याचे आणि बागडण्याचे हक्काचे ठिकाण…. आज तिशी पार केलेल्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणी त्या बागेत असतील… मात्र काळानुरूप बालोद्यानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं… गेल्या 20 वर्षांपासून हे उद्यान बकाल झाल्याने बंद अवस्थेत होतं… मात्र वणीतील काही सुजाण नागरिक पुढे आले… त्यांनी बालोद्यान फुलवण्याचा वसा घेतला… लोकसहभाग वाढत गेला… आणि आता एक उजाड झालेली बाग फुलू लागली आहे. हे बालोद्यान पुन्हा नव्याने आकार घेत आहे… वणीकर पुन्हा एकदा आता या उद्यानाची वाट बघत आहे… रविवारी या बालोद्यानात एका छोटेखानी कार्यक्रमात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत इथे लोकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात आले. आता या बागेच्या सौंदर्यीकरणाचा शेवटचा टप्पा आहे.
ही बाग वणीतील शाळा क्रमांक 6 च्या मागे, अमृतभवनच्या बाजुला आहे. 1987 मध्ये अभिनेते नीळू फुले, डॉ. श्रीराम लागू , तनूजा यांच्या उपस्थितीत बालोद्यानाचं उद्धाटन झालं होतं. मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे, फुलांची आणि फळांची झाडं या बागेत होती. बालोद्यान केवळ बच्चेकंपनीचच नाही तर मोठ्यांचं देखील फिरण्यासाठीचं हे एक आवडीचं ठिकाण बनलं. दिवंगत प्रा.राम शेवाळकर यांचं या बागेकडे विशेष लक्ष असायचं. त्यांच्या प्रयत्नातूनच मोठे सेलिब्रिटी या बागेच्या उद्घाटनप्रसंगी आले होते. मात्र काही वर्षांत परिसरात अतिक्रमण वाढू लागलं. बागेत मद्यपी, टवाळखोर यांचा वावर वाढला. त्यातच पालिकेचं या बालोद्यानाकडे दुर्लक्ष झालं. बागेची दुरवस्था झाली. त्यामुळे वणीकरांनी या बागेकडे पाठ फिरवली आणि हे बालोद्यान बंद झालं.
सुमारे 20 वर्षांपासून हे बालोद्यान बंद अवस्थेतच होतं. वणीतील सामाजिक कार्यकर्ते राजू तुराणकर यांच्या डोक्यात बालोद्यानाच्या सुशोभिकरणाची कल्पना आली. त्यांनी ही कल्पना लगेच त्यांच्या सहकार्यांना सांगितली. सर्वांना ही कल्पना आवडली. सर्वांनी श्रमदानातून बालोद्यानाला पुन्हा जुने दिवस परत आणण्याचे ठरवले. यासाठी स्वच्छतेचा वसा देणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचा दिवस निश्चित करण्यात आला.
23 फ्रेबुवारी 2018 ला गाडगेबाबांच्या जयंतीला बालोद्यानाची साफसफाई करण्यासाठी नगरसेवा समितीचे कार्यकर्ते, डेबुजी विचारमंच, गाडगेबाबा जयंती उत्सवाचे कार्यकर्ते सहभागी झाले. बागेत साफसफाईला गेल्यावर बागेची अत्यंत बकाल अवस्था होती. बागेत मोठमोठे झुडपं वाढलेले होते. सर्व परिसर कच-याने भरलेला होता. परिसरातील लोक बागेचा वापर शौचास जाण्यासाठी करत होते. नगरपालिकाही त्यात कचरा टाकत होती. मात्र बागेच्या स्वच्छतेचा वसा उचललेल्या या स्वच्छतादुतांती हार मानली नाही. त्यांनी श्रमदानाला सुरूवात केली. तेव्हापासून दर रविवारी या बागेची स्वच्छता सुरू होती.
बाग पुन्हा फुलवण्याचा वसा काही लोकांनी घेतल्याचे कळताच या कामात आणखी लोकसहभाग वाढला. स्वयंसेवक जुळू लागले. कुणी श्रमदान करून तर कुणी आर्थिक मदत करून ही बाग फुलवण्यास हातभार लावला. ट्रॅक्टर, जेसीबी लावून त्याची सफाई करण्यात आली. अखेर दोन महिन्यांत या बागेचं संपूर्ण रूपडंच पालटलं. या बागेला जुने दिवस परत आणण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. एका दानशुराने तर एक लाख रुपयांचं मुलांना खेळण्याचं साहित्य देण्याचं आश्वासन दिलं आहे.
रविवारी 15 एप्रिलला या बागेत बैठक आसने लावून बसण्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, नगरसेवक पी के टोंगे, खुसपुरे सोबतच नगरसेवा समितीचे व जय गुरु जय डेबू विचारमंचाचे सदस्य आणि साफसफाईला मदत करणारे स्वयंसेवक उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी बागेच्या सौंदर्यीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. तसंच लवकरात लवकर काम पूर्ण करून बालोद्यानाचं लोकार्पण करू असं सांगितलं.
बालोद्यान स्वच्छतेच्या कामात पुढाकार घेणारे समाजिक कार्यकर्ते राजू तुराणकर हे वणी बहुगुणीशी बोलताना म्हणाले की…
बालोद्यान पुन्हा सुरू होणार असल्याचा आनंद आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे हे कार्य तडीस नेता आले. पावसाळा लागताच या बागेत विविध फुलांची आणि फळांची झाडं लावण्याचं नियोजन केले आहे. बालोद्यानाला तीन गेट आहे. मात्र सध्या केवळ अमृतभवन परिसरातील गेट सुरू आहे. हे तिन्ही गेट सुरू केल्यास लोकांना शाळा क्रमांक 6, साईनगरी या भागातूनही प्रवेश करता येणार आहे. या गेटच्या मार्गात अतिक्रमण असल्याने हे गेट सुरू करण्यास नगर पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसंच एकदा बाग सुरू झाल्यावर त्याची डागडुजी करण्याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. बागेत आलेल्या लोकांना टवाळखोरांचा त्रास होऊ नये यासाठी तसेच बालोद्यान परिसरात लक्ष ठेवण्यासाठी चौकीदार व सुरक्षारक्षकांची देखील गरज आहे. वणीकरांना फिरायला जाण्यासाठी कोणतीच जागा नाही. इथल्या बारमाही उष्ण व प्रदूषित वातावरणात ही बाग महत्त्वाची ठरणार आहे. बालोद्यान हे आपण सर्वांचे असून बालोद्यानास अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी जी मदत करता येईल ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.