अखेर न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला रस्त्याच्या कामाला सुरूवात

वणीकरांचा शॉर्टकट होणार टू लेन व सिमेंटचा

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील न्यायाधिश निवास ते एसडीओ बंगला या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा रस्ता यवतमाळ रोड ते नागपूर रोड यांना जोडणारा महत्त्वाचा रोड आहे. एकता नगर पासून बस स्टँड, पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय इत्यादी नेहमीच्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात येतो. गेल्या 20 वर्षांपासून या रस्त्याचे कोणतेही काम झाले नव्हते.

याठिकाणी पक्का रस्ता करावा याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हा रस्ता शॉर्टकट असल्याने रहदारीचा होता. मात्र रस्ता दुर्लक्षीत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. शासनाकडे या कामासाठी पाठपुरावा केला. अखेर या कामासाठी निधी मंजूर झाला.

रस्ता जरी मंजूर झाला असला तरी या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे इथे असणारं अतिक्रमण होतं. या संपूर्ण रस्त्यावर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. मात्र अतिक्रमण धारकांना विनंती करताच त्यांनीही लगेचच अतिक्रमण काढून घेतले व अखेर या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली.

या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय गृहराज्य मंत्री खा. हंसराज अहिर यांच्या हस्ते झाला. यावेळी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा रस्ता संपूर्णतः सिमेंटचा असून हा दोन लेनचा मार्ग आहे. याची लांबी 160 मीटर तर रुंदी 14 मीटर आहे. या रस्त्यासाठी अंदाजित खर्च हा 56 लाख आहे. या रस्त्याची विशेषतः म्हणजे हा लोकमान्य टिळक कॉलेज, एकता नगर पासून बस स्टॉपकडे जाण्यासाठी सर्वात जवळचा रस्ता आहे. तसेच या रस्त्यावर शासकीय निवासस्थान आहे.

पंढरा दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करणार
‘वणी बहुगुणी’शी बोलताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की सत्तेवर आल्यावर मी सर्वात आधी या रस्त्याला प्राधाण्य दिलं होतं. अखेर पाठपुरावा केल्यानंतर निधी मंजूर झाला आणि लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं. हा रस्ता फक्त 15 दिवसात तयार होणार आहे. याआधीही जो 4.5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे वणीतील सर्व प्रभागात 24 ठिकाणी काम सुरू आहे. या रस्त्याचं काम पूर्ण होताच दिपक टॉकीज ते जंगली पीर दर्गा, खाती चौक ते तुटी कमान व नांदेपेरा मार्ग ते विठ्ठलवाडकडे जाणारा डीपी रोड याचे ही काम सुरू केले जाणार.

या रस्त्याच्या कामासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. सोयीचा व शॉर्टकट रस्ता असल्याने या मार्गावरून जाणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या रस्त्याच्या कामाला सुरूवात झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.