14 प्रभागासाठी 62 मतदान केंद्र निश्चित, आजपासून नामनिर्देशन सुरु
मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा..
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरात एकूण 14 प्रभागांसाठी 62 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत 49,571 मतदार सहभागी होणार असून त्यात पुरुष 24,607 आणि महिला 24,964 मतदारांचा समावेश आहे. यावेळी एका प्रभागातील सर्व मतदान केंद्र एकाच इमारतीत ठेवण्यात आले असून फक्त तीन प्रभागांत जागेअभावी वेगवेगळ्या इमारतीत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. गोंधळ टाळण्यासाठी प्रशस्त शाळा इमारती व मोकळ्या जागांचा मतदान केंद्र म्हणून वापर करण्यात आला आहे. विधानसभेत मतदान केलेले व आता करावयाचे मतदान केंद्र वेगळे राहू शकते. मतदारांना सोयीसाठी मतदान केंद्र शोधण्यासाठी QR कोड जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया :
निवडणूक अर्ज 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत (सुटीचा दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत. या काळात फक्त उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व सुचकांनाच निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीकृत पक्ष उमेदवारासाठी एक सुचक, तर अपक्ष उमेदवारासाठी पाच सुचक असतील. सुचक त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे. एकाच व्यक्तीने अनेक उमेदवारांचे सुचकत्व केल्यास पहिलाच फॉर्म ग्राह्य धरला जाईल. अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी Rs. 2000 तर राखीव उमेदवारांसाठी Rs. 1000 निश्चित करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
नामनिर्देशनासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट, मालमत्ता-दायित्व व गुन्हेगारी संदर्भातील शपथपत्र, अपत्य संदर्भातील शपथपत्र, राजकीय पक्षाच्या उमेदवाराकरिता जोडपत्र एक व दोन, मतदार यादीची प्रमाणित प्रत, तसेच अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र (किंवा अर्जाची पोच) सादर करणे आवश्यक आहे.
प्रशासनाची तयारी जोमात
प्रशासनाकडून घरोघरी जाऊन मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार असून मतदान केंद्रावर आपले नाव व क्रमांक सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. रविवारी दुपारी प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात नामनिर्देशन पत्र भरण्यासंबंधी व इतर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.



Comments are closed.