नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार उलथापालथ ?
मनाजोगे न झाल्यास एक गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरात सध्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. यावरूनच सर्व नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. तर एका राजकीय पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस बघायला मिळत आहे. जर मनाजोगे झाले नाहीतर वेगळी वाट निवडून तालुक्यातील एक गट बाहेर निघण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती चर्चा स्थानिक राजकारणात रंगत आहे. जर असे झाल्यास याने शहरातील राजकारण धवळून निघू शकते.
मारेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर शिवसेना 4 जागा व भाजप 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर आहे. तर मनसे 2 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 जागा जिंकली आहे. तर एक अपक्ष नगरसेवक आहे. सध्या महाविकास आघाडीद्वारा सर्वाधिक जागा मिळाल्या त्या पक्षाला नगराध्यक्ष पद देण्याचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी सत्ता स्थापन करण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक जवळ येताच मारेगाव शहरात सध्या राजकीय दिवाळी सुरु झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सध्या नेत्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. मारेगाव शहरात अनेक नेते आजपर्यंत आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. यातील अनेकांनी पक्षामध्ये पदाची कधीही अपेक्षा केली नव्हती. मात्र आता प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ चांगले पद राहावे यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहे.
अशातच नगरपंचायतचे अध्यक्षपद हाती आले तर काय करता येऊ शकते याचा अंदाज मागील कार्यकाळामध्ये दिसल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षातील गॉडफादर तर्फेही आपल्या पदरात काही पडून घेता येईल काय याचाही अंदाज घेतला जात असून जर मनासारखे झाले नाही तर वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे.
आता पक्ष काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहेत. परंतु तालुक्यातील एका पक्षाच्या मोठ्या गटाला मनासारखे न मिळाल्यास एका पक्षाचा एक गट जय महाराष्ट्र असेही होऊ शकते अशी विश्वसनीय माहिती आहे. आता हे बघणे उत्सुक्याचे राहील की नेमके अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होईल.
Comments are closed.