रेतीच्या अवैध व्यवसायाला पाठबळ कोणाचे?

रात्र होताच रेतीच्या अवैध वाहतुकीला ऊत

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यामध्ये अवैध रेतीचा व्यवसाय सध्या जोमात सुरू आहे. रात्रभर चालणा-या अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे नागरिकांना तर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शासनाचा महसूलही बुडत आहे. या अवैध व्यवसायाला नेमके पाठबळ कोणाचे हा चर्चेचा विषय असून याकडे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न आता सर्वसामान्य उपस्थित करीत आहे.  

मारेगाव तालुक्याच्या उत्तरेला वर्धा नदी वाहते. निर्गुडा नदीचा उगमसुद्धा याच तालुक्यामध्ये आहे. तसेच तालुक्यामध्ये अनेक नालेसुद्धा ओसंडून वाहतात. रेतीचे मोठ्या प्रमाणावर या भागात साठे निर्माण होत असल्याने रेती व्यवसाय करणाऱ्यांचे या परिसरावर नेहमीच लक्ष असते. आजपर्यंत रेतीच्या घाटाचे हरास व्हायचे होते, तेव्हा तर अवैध रेतीवाल्यांची चांगलीच चंगळ होती. महिन्यातून एखादेवेळेस महसूल तसेच पोलीस विभागातर्फे कारवाई, वसुली आणि पुन्हा महिनाभर अवैध व्यवसायाला मंजुरी. अशाप्रकारचे धोरण आजपर्यंत होते. अनेकांनी यातून मोठी मायाही कमावली.

आता घाट हर्रास झाले आहे. रेतीघाटावरून रेतीची वाहतूकही सुरू झाली. रेतीवाहतूक सकाळी किती वाजेपासून रात्री किती वाजेपर्यंत करायची याचाही निश्चित नियम आहे. परंतु रात्र जागत रेतीची अवैध वाहतूक रात्रभर सुरू असते. रात्रीच्या सुमारास एक वाहन दोन ते तीन ट्रिप मारतात. त्यामुळे कोणी अधिकारी येते का हे पाहण्यासाठी प्रत्येक वाहनधारकांची ठराविक माणसे गस्त घालत असतात.

नियमानुसार कारवाई करणारेवाले गेले कुठे?
एरव्ही अवैध वाहतूक आहे म्हणून रॉयल्टी असलेल्या रेतीच्या वाहनांना थांबवणारे तलाठी, इतर अधिकारी यांचा मात्र थांगपत्ता दिसून येत नाही. एकीकडे पठाणी वसुलीच्या साठी प्रसिद्ध असलेल्या मारेगाव तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांचा कूठेच लवलेशही दिसत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

हे देखील वाचा:

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत होणार उलथापालथ ?

Comments are closed.