नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचा सत्कार
गणेसोत्सव दरम्यान उत्कृष्ट नियोजनाबद्दल ठाणेदारांच्या हस्ते सत्कार
विवेक तोटेवार, वणी:वणीत नुकतेच पार पडलेल्या गणेश विसर्जनामध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबदल्य नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. दिनांक 17 ऑक्टोबरला बुधवारी संध्याकाळी पोलीस स्टेशन इथे झालेल्या एका कार्यक्रमात शांतता कमिटीच्या वतीने वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांची उपस्थिती होती.
गणेश विसर्जनाच्या काळात निघणारी मिरवणूक, विसर्जन यामुळे या सर्वांचे नियोजन करण्यात कसोटी लागते. हा उत्सव आनंदाचा असल्याने यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतो. सर्वसामान्यांकडून शांतता कमिटीच्या वतीने सूचना घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे. जेणेकरून हा उत्सव शांततेत कसा पार पाडला जाईल यासाठी प्रयत्न केला जातो.
यासोबतच मिरवणूक काळात रस्त्याची दागडुजी करणे, शहर स्वच्छ ठेवणे, रस्त्यावर विद्यूत आणि पथदिव्यांची व्यवस्था करणे, विसर्जन स्थळी प्रदूषण होऊ नये यासाठी विसर्जन कलश आणि निर्माल्य कलशाची व्यवस्था करणे इत्यादी गोष्टींचे उत्कृष्ट नियोजन करणे या गोष्टी गरजेच्या असते. हे नियोजन योग्य रित्या केल्याबद्दल नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की…
उत्सव हे आनंदातच साजरे व्हायला हवे. मात्र त्याला जर योग्य त्या नियोजनाची जोड मिळाली तर सर्वसामान्यांचा त्रास वाचून हा आनंद द्विगुणीत होतो. गणेशोत्सव दरम्यान सर्वोत्कृष्ट सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही एक ते दोन महिन्यांपासूनच कामाला लागलो होतो. त्यामुळे ऐन वेळी कोणतीही तारांबळ न उडता संपूर्ण गणेशोत्सव हा निर्विघ्ण आणि जल्लोषात पार पडला. यात मला सर्व मंडळाचे, प्रशासकीय अधिकारीस, माझे सहकारी यांचे सहाकर्य लाभले त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे. तसेच मी जे कार्य केले त्याची हा सत्कार पावती असल्याचंही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, गणेश मंडळाचे प्रतिनिधी, शांतता कमिटीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.