अखेर प्रशासनाला जाग; नांदेपेरा-शेलू रस्ता दुरुस्तीला सुरुवात

मनसेच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी धाव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नांदेपेरा ते शेलू आणि नांदेपेरा ते रांगणा या मार्गांची झालेली दुरवस्था आणि रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शेलू ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. 7 ऑक्टोबर रोजी आंदोलन सुरू होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दखल घेत नांदेपेरा ते शेलू रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. तसेच रस्ता नूतनीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.

नांदेपेरा ते शेलू मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विद्यार्थी, महिला, रुग्ण आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या मार्गावर लहान-मोठे अपघातही घडत असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, गावातील एका दुर्दैवी घटनेमुळे आणि प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

त्यानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात ठाणेदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला 7 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. तसेच रस्ता नूतनीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले. मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या भूमिकेमुळे रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.

 

अन्यथा रस्त्यावर उतरणार…!
प्रशासनाने दिलेला शब्द न पाळल्यामुळेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. जनतेच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी मनसे सदैव रस्त्यावर उतरेल. आता रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचे यावर पूर्ण लक्ष राहील.”

— फाल्गुन गोहोकार, तालुकाध्यक्ष, मनसे वणी

या कारवाईनंतर शेलू, नांदेपेरा आणि रांगणा परिसरातील ग्रामस्थांनी मनसे नेते राजू उंबरकर, पदाधिकारी आणि आंदोलकांचे आभार मानले.

Comments are closed.