सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राला लोककलेची एक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. गोंधळ, दशावतार, भारूड, पोवाडा, लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, वासुदेव अशा अनेक लोककलांनी विश्वात महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ही कला सादर करणारे अनेक लोककलावंत आहेत. पूर्वी त्यांना लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्ही मिळायचा. किंबहुना समाज त्यांना सन्मानपूर्वक सांभाळायचा. मात्र आजचं चित्र अत्यंत भीषण आहे. या कलावंतांकडे व कलेकडे विशेष लक्ष दिलं जात नाही.
आपली संस्कृती, आपल्या लोककला आपला वारसा आहे. नव्या पिढीला तर याबद्दल माहिती असणं तर दुरापास्तच. अनेकजण पीएचडीवगैरेसाठी नेमकं तेवढं संशोधन करतात. मोठमोठ्या स्टेजवर आपले शोधनिबंध सादर करतात. काही आस्थेने करतात तर काही आवडीने. शासनस्तरावर कागदोपत्रीही बरंचकाही होत असतं. मात्र ही कला जिवंत ठेवणारे अजूनही जगण्यासाठी संघर्षच करीत आहेत.
शिक्षणाचा व जागृतीचा अभाव हा या लोककलावंतांचा वर्तमानातील सर्वात मोठा संघर्ष आहे. विदर्भात नाथजोगींना गारपगारीदेखील म्हणतात. वणी, जि. यवतमाळ येथे एका 65 वर्षीय नाथजोगीची भेट झाली. गुलाब नागो जाधव असे त्यांचे नाव. केळापूर तालुक्यातला हा नाथजोगी वणीतील एका परिसरात खड्या आवाजात गात होता. वडलांपासूनच गायनाचा वारसा त्यांना लाभलेला. त्यांच्या वाद्याला किंगरी किंवा सारंगी म्हणतात असं त्यांनी सांगितलं. नारळाच्या मोठ्या कवटीला घोरपडीची कातडी, एक फूट त्याला लाकडी रॉड आणि बांधलेली तार असते. व्हायोलीन वाजवायच्या ‘‘बो’’सारखं त्याच्याकडे ‘‘बो’’ असतो. धनुष्यासारखा थोडा वाक आणि त्याला घोड्याचे केस असतात. त्याला घुंगरूदेखील बांधतात.
मी गंमत पाहत होतो. म्हातारे गुलाबराव स्वच्छ पांढरं धोतर नेसले होते. डोक्यावरतील तेवढाच शानदार गुलाबी फेटा होता. आवाज खडा आणि सुरात होता. सगळ्यांत खास गोष्ट जाणवली ती म्हणजे उत्स्फूर्त काव्याची. ज्यांच्या अंगणात त्यांची ‘‘मैफल’’ सजते त्या घरातील व्यक्तीचं नाव घेऊन ते इंस्टंट गाणं गायला सुरुवात करतात. परंपरेने व अनुभवानं आलेली ही कला वयाच्या 65व्या वर्षीदेखील ते जोपासत आहेत. मुलं काही काम करतात. त्यांची नातवंड शाळेत जातात हे त्यांनी फार कौतुकाने सांगितलं.
या कलावंताना एक ठिकाण नसतं. सदैव भटकंती असते. आता काहीजण स्थिर व्हायला लागलेत. अलीकडे शेती, मजुरी किंवा इतर कामे करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. जुनी माणसं सोडली तर नवीन माणसं सध्या या लोककलेत दिसत नाहीत. यांचे जगण्याचे निराळे संघर्ष आहेत. कधीकाळी यांची संघटनादेखील स्थापन झाल्याचे कळले. शिक्षण, रोजगार आणि स्थैर्य या विषयांशी त्यांची आता हळूहळू ओळख व्हायला लागलीय.
अत्यंत उत्स्फूर्त काव्य, संग्रहातील अनेक अभंग, भक्तिगीत आण बरंच काही सोबत त्यांचं वाद्य आणि जगण्यातला प्रचंड आत्मविश्वास घेऊन वाट मिळेल तिकडे हे कलांचे ‘‘नाथ’’ कलेचेच ‘‘जोगी’’ होऊन रसिकांच्या सेवेत निघतात. या सर्व लोककलावंतांना सलाम……