नवरगाव येथील सालगड्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चेला उधाण
शेतातील कुंपणात आलेल्या विजेचा करंटमुळे मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: तारांमधल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने नवरगाव येथील शेतात काम करणा-या सालगड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विलास गणपत मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील खेडी (सावली) येथील रहिवाशी आहे. एमएसईबीचे जिवंत तार शेताच्या जंगली जनावरापासून संरक्षण करणा-या कुंपणावर पडल्याने त्याचा प्रवाह शेताच्या तारांमध्ये आल्याने विलासचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सदर घटनेबाबत परिसरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
वणी तालुक्यातील वणी ते कायर रस्त्याच्या कडेला नवरगाव जिनिंगजवळ वणीतील प्रभाकर नारायण भोयर यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात एक फार्महाऊस आहे. सदर शेतात विलास मोहुर्ले हा सालगडी म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करीत होता. त्याच्या पत्नीचे पूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे तो आपल्या मुलासह शेतातील फार्महाऊसवर राहत होता. तर त्याचा मुलगा हा कायर येथील एका दुकानात काम करतो.
पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सकाळी विलास शेताची पाहणी करण्यासाठी गेला असता त्याला एक कुत्रा शेताला जनावरांपासून रक्षणासाठी लावलेल्या कुंपणात अडकलेला दिसला. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विलासला वीजेचा जोरदार धक्का बसला. शेताच्या रक्षणासाठी खुंट्या गाडून लावलेल्या तारेवर शेतातून जाणारी वीजवाहक तार तुटून पडली. त्यामुळे त्या तारेचा प्रवाह वीजप्रवाह हा शेतातील तारांमध्ये आला. त्यामुळे त्यात विलासचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळगावी नेला.
घटनेबाबत उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्ह
या घटनेबाबत आणखी तर्कवितर्क लावले जात आहे. शेतात संरक्षणासाठी लावण्यात येणा-या तारेवर करंट लावण्यासाठी वरच्या बाजूला प्लास्टिक लावून तार गुंडाळली जाते. त्यामुळे कुत्रा आणि सालगडी यांचा मृ्त्यू एकाच वेळी शॉक लागून मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. आदल्या दिवशी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेतातून गेलेली एमएसईबीची जिवंत तार शेतीच्या कुंपणावर पडल्याने त्याच्यातून आलेल्या प्रवाहाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी घटनेच्या आदल्या रात्री वादळी वा-यासह पाऊस आलाच नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.